Sat, Sep 22, 2018 14:40होमपेज › Kolhapur › मुद्रा कर्ज व्याजी की बिनव्याजी?

मुद्रा कर्ज व्याजी की बिनव्याजी?

Published On: Mar 19 2018 1:46AM | Last Updated: Mar 19 2018 1:28AMराशिवडे : प्रवीण ढोणे

सुशिक्षित बेकार तरुणांनी  व्यवसाय उभा करून स्वत:च्या पायावर ते उभारावेत, या उद्दात्त हेतूने सुरू करण्यात आलेले मुद्रालोन हे व्याजाने की बिनव्याजी यामध्ये संम्रमावस्था निर्माण झाली आहे. बँक अधिकारी व ग्राहक यांच्यात यामुळे वादावादीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे सरकारने याबाबत स्पष्ट धोरण बँकांपर्यत पोहोचणे गरजेचे बनले आहे.

लघुउद्योगांना सहजपणे कर्जपुरवठा व्हावा, या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एप्रिल 2015 मध्ये मुद्रा योजना सुरू केली. या योजनेसाठी वीस हजार कोटींचे भक्कम सरकारी भांडवलही दिले. केवळ 7 टक्के व्याजदराने सुरू असणार्‍या या योजनेला प्रतिसादही मिळत आहे. शिशु श्रेणीसाठी पन्नास हजार, किशोर श्रेणीसाठी 50 हजार ते पाच लाख तर तरुण श्रेणीसाठी 5 लाख ते 10 लाख असे कर्जवितरणचे स्वरूप आहे. हे कर्ज वितरण करताना जामीन नाही, मोर्गेज  नाही,10 टक्के भांडवलाचीही गरज नसणार आहे. ही योजना शासकीय बँकामध्ये सुरू करण्यात आली आहे. सहजपणे कर्ज देणारी मुद्रा योजना सुशिक्षित बेकारांना आधारवडच ठरत आहे. राज्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुद्रालोन देताना राष्ट्रीयीकृत बँकांनी  व्याज आकारणी करू नये, असे सांगितले होते, मंजूर रकमेचे व्याज राज्यशासन भरेल, असेही म्हटले होते. त्यामुळे नवनवे उद्योग उभारणार्‍या तरुणांनी बँकेकडे रिघच लावली. बँकांनाही वरिष्ठांचे बिनव्याजी कर्ज वितरणाचे आदेश नसल्याने गोची निर्माण झाली आहे.जर मुद्रालोनचे व्याज राज्यशासन भरणार असेल तर तसे आदेश संबंधित बँकांना होणे गरजेचे होते; परंतु तसे कोणतेच आदेश नसल्याने बँक अधिकारी व लोनधारक यांच्यामध्ये वादावादीचे प्रकार घडत आहेत.

त्यामुळे प्रामुख्याने मुद्रालोनच्या व्याजाबाबत राज्यशासनाने भूमिका जाहीर करत संबंधित बँकांना त्यांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देणे गरजेचे आहे.