Sun, May 26, 2019 08:56होमपेज › Kolhapur › केंद्रीय प्रवेश प्रक्रियेबाबत 11 रोजी बैठक

केंद्रीय प्रवेश प्रक्रियेबाबत 11 रोजी बैठक

Published On: Jun 08 2018 1:22AM | Last Updated: Jun 08 2018 12:02AMगडहिंग्लज : प्रतिनिधी

गतवर्षी संपूर्ण राज्यात कोल्हापूरनंतर सर्वात प्रथम गडहिंग्लज तालुक्याच्या ठिकाणी 11 वी विज्ञान शाखेची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबवून शिक्षण विभागाने नवा पायंडा पाडला होता. या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमुळे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना सहजरीत्या प्रवेश मिळाला होता. काही संस्थांनी केवळ एक वर्षाच्या मुदतीचेच संमतीपत्र दिल्याने यावर्षी पुन्हा केंद्रीय प्रवेश प्रक्रिया होणार की नाही, यावर चर्चा सुरू असताना शिक्षण उपसंचालकांनी थेट गटशिक्षणाधिकार्‍यांना पत्र देऊन 11 जून रोजी बैठक घेण्याचे आदेश दिल्याने याबाबतच्या हालचाली पुन्हा गतिमान झाल्या आहेत.

गडहिंग्लज तालुक्यामध्ये गेल्या तीन वर्षांपासून अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेश प्रक्रियेबाबत समस्या निर्माण झाली होती. अनेक गोरगरीब, गुणवंत विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवूनही केवळ पैसा व वशिल्याअभावी अकरावीच्या प्रवेशापासून वंचित राहावे लागत होते. यामुळे अनेकदा विविध संघटनांसह पालकांचे आंदोलने व मोर्चे निघत होते. अनेकदा यातून वादाचे प्रसंगही मोठ्या प्रमाणात घडत होते.

केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत चर्चाही अनेकदा झाल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षा अंमलबजावणी होण्यामध्ये अडचणीही निर्माण झाल्या होत्या. गेल्यावर्षी पंचायत समितीच्या सदस्यांनी व गटशिक्षणाधिकार्‍यांनी यामध्ये तातडीने लक्ष देत हा विषय मार्गी लावण्याचे ठरविले. पंचायत समिती सभेत याबाबत बैठक घेऊन कोणत्याही परिस्थितीत गडहिंग्लजला केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्याची भूमिका घेतली. यानंतर अनेक बैठकाही पार पडल्या. यामध्ये काही संस्थाचालकांनी याला विरोध दर्शविला होता. तर नव्या संस्था चालकांनी याचे स्वागत केले होते.

या प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाने मेहनत घेऊन चांगल्याप्रकारे प्रवेश प्रक्रिया राबविली होती. गतवर्षी यामध्ये या निर्णयाला अचानक स्थगितीही देण्यात आली होती. यामुळे ही प्रक्रिया लटकण्याच्या स्थितीत असताना पुन्हा एकदा पदाधिकार्‍यांनी जोर लावून याचे नियोजन केल्याने अखेर गतवर्षी गडहिंग्लजला विज्ञान शाखेचा प्रवेश केंद्रीय पद्धतीनेच झाला होता. यावर्षीही ही प्रक्रिया राबविण्याबाबत गेल्या मासिक सभेत चर्चा झाली होती. यासाठी नव्याने पुन्हा काही प्रक्रिया कराव्या लागणार असून त्याची अंमलबजावणी शिक्षण विभागाकडून होणे अपेक्षित असल्याने ही प्रक्रिया कधी सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर शिक्षण संचालकांनी याबाबत लेखी आदेश काढत बैठकीचे आदेश दिल्याने आता याबाबतच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.