Fri, Apr 19, 2019 12:20होमपेज › Kolhapur › व्हॅलिडिटीसाठी ‘त्यांचा’  जीव लागला टांगणीला!

व्हॅलिडिटीसाठी ‘त्यांचा’  जीव लागला टांगणीला!

Published On: Jun 29 2018 12:55AM | Last Updated: Jun 28 2018 11:38PMकोल्हापूर : राजन वर्धन

जातीची पडताळणी ठोस कागदपत्रांशिवाय करता न आल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या या पदाधिकार्‍यांचा जीव टांगणीला लागला आहे. सप्टेंबर, ऑक्टोबरला झालेल्या निवडणुकीतील अजूनही 10 जणांचा आजही निकाल प्रलंबितच आहे. यातील काही उमेदवारांच्या सुनावणी रेंगाळल्या आहेत, तर काही उमेदवारांचा निकाल अंतिम टप्प्यात असल्याचे समितीकडून सांगण्यात येत आहे. 
 वर्ष होत आले तरी निकाल लागत नसल्याने या पदाधिकार्‍यांचा जीव टांगणीला लागला आहे. यातच विजयी उमेदवार ‘व्हॅलिडिटी’ मिळविण्यासाठी आणि पराभूत उमेदवार विरोधी उमेदवाराचे जात प्रमाणपत्र रद्द होण्यासाठी विविध  मार्गाने प्रयत्न करत आहेत. 

जिल्ह्यात गतवर्षी माहे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या 477 ग्रामपंचायतींत विविध जातींच्या प्रवर्गांवर सुमारे साडेचार हजारांवर ग्रामपंचायत सदस्य निवडून आले होते. यातील 23 नूतन सरपंच, सदस्यांवर त्यांच्याकडून पराभूत झालेल्यांनी लेखी तक्रारी केल्या होत्या. 

त्यांना नोटिसा बजावून वेळोवळी सुनावण्या घेतल्या; पण बहुतांश जणांनी अनेक हरकती घेत वेळ मारून नेण्यात धन्यता मानली. पण काहीही झाले तरी या सदस्यांना तक्रारदारांसह समितीसमोर जातीचे सत्य पुरावे सादर करावे लागणार आहेत. यामध्येे संबंधितांना महसुली पुरावा, मूळ पुरुष व त्यातून आलेली सरळ वंशावळ सादर करावी लागते.

दरम्यान, जात पडताळणीची  समिती तक्रारदारांचे पुरावे पडताळून विरोधी बाजूंच्या अर्जदारांसमक्ष सुनावणी करत आहेत. दरम्यान, याबाबत प्रलंबित तक्रारींबाबत संबंधितांना अंतिम नोटीस काढून आवश्यक कागदपत्रे दाखल न केल्यास अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे जातपडताळणी समितीचे सचिव बाळासाहेब कामत यांनी सांगितले.