Fri, Jul 19, 2019 01:33होमपेज › Kolhapur › वळवामुळे काजू बी काळी; दर कोसळले

वळवामुळे काजू बी काळी; दर कोसळले

Published On: Jun 04 2018 1:04AM | Last Updated: Jun 03 2018 10:14PMचंदगड : नारायण गडकरी

चंदगड तालुक्यासह कोकणशी संलग्न असलेल्या प्रदेशात काजूची आवक गेल्या दोन महिन्यांत बर्‍यापैकी झाली असली, तरी एप्रिल, मे महिन्यापासून वळीव पावसाने चंदगड तालुक्याला झोडपून काढले. याचा परिणाम काजू बी काळी होण्यावर झाल्याने यावर्षी दर अधिक मिळाला असला, तरी उत्पादनात निम्म्याहून अधिक घट झाली आहे. काजू उत्पादन कमी झाल्याने एकंदरीत हिशेब गेल्यावर्षीच्या तुलनेत सारखाच आहे.  रविवारी नागणवाडी येथील आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात काजू बीची आवक होती. मात्र, नुकत्याच झालेल्या वळीव पावसामुळे काजू बी काळी पडल्याने दर गडगडले. तब्बल 15 ते 20 रुपयांनी दर कमी झाले. दर वाढणार, या अपेक्षेने शेतकर्‍यांनी काजू बीचा साठा करून ठेवला होता. मात्र, अचानक दर कमी झाल्याने शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे.     

जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात काजूला मोहर येतो. याच महिन्यात धुक्यामुळे काजू मोहर जळून गेला होता. त्यातच वळीव पावसामुळे काजू बी काळी पडली. त्यामुळे काजूचे उत्पादन घटले. आज किरकोळ दर 135 ते 140 रुपये, तर होलसेल दर 145 रुपये होता.

त्यातही काळी काजू असेल तर त्यापेक्षाही दर कमी होता. मृगनक्षत्रानंतर काजू विक्री केली जात नाही. शेवटचीच काजू विक्री करण्यासाठी नागणवाडीच्या बाजारात शेतकर्‍यांनी गर्दी केली होती. मात्र दर अचानक पडल्याने निराशा झाली.  

दोन वर्षापूर्वी  इजिप्त, आफ्रिका, नायझेरिया या देशातून काजू कारखानदारांनी काजू आयात केली होती. स्थानिक काजू दरापेक्षा परदेशी काजू स्वस्तात मिळत असल्यामुळे  काजूचे दर गडगडले होते. त्यातच काजू कारखानदार व व्यापार्‍यांची एकदिलाची संघटना झाली होती. गेल्यावर्षी काजूचा दर 120 रुपये प्रतिकिलो होता. तर यावर्षी तो 160 ते 165 रुपयांवर पोहोचला होता. यावर्षी काजू उत्पादनात 50 टक्क्यांनी घट झाल्याने दर कायम स्थिर राहिल असा अंदाज वर्तवला जात होता. चंदगडचा काजूगर उत्तम प्रतिचा व चवीष्ठ आहे. त्यामुळे त्याला देशात सर्वत्र मागणी आहे. तालुक्यातून दरवर्षी सुमारे 90 कोटी रुपयांचे काजू उत्पादन होते. इतक्या मोठया प्रमाणात उत्पादन असूनही व्यापारी आणि दलालांच्या एकजूटीमुळे उत्पादन काढणार्‍या शेतकर्‍यांना योग्य हमीभाव मिळत नाही.