Tue, Jan 21, 2020 10:41होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले

कोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले

Published On: Jul 22 2019 3:22PM | Last Updated: Jul 22 2019 3:26PM
कोल्हापूर : प्रतिनिधी

दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणावर दंडाची कारवाई करीत असतानाच अचानक कार चालकाने गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला उडवल्याची घटना घडली. छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रूग्णालय (सीपीआर) चौकात आज, सोमवार (दि.२२) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. यात महिला कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाली आहे. विद्या निवृत्ती वाळके (वय-28, रा. पोलिस लाईन, कसबा बावडा) असे या महिला कॉन्स्टेबलचे नाव आहे. 

याप्रकरणी मोटर चालक संजय शंकर पाटील (रा. केखले, ता. पन्हाळा) याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. महिला कॉन्स्टेबल विद्या वाळके या सीपीआर चौकात ड्युटीवर होत्या. यावेळी दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणावर दंडाची कारवाई करीत असताना पन्हाळ्याकडून कसबा बावडा मार्गे जात असलेल्या मोटारीने त्यांना जोरात धडक दिली. गर्भवती महिला कॉन्स्टेबलच्या पोटाला मार लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी शासकीय रूग्णालयात गर्दी केली.