केंबळी : वार्ताहर
काळम्मावाडी उजवा कालवा बिद्री ते शेंडूर दरम्यान शेंडूर (ता.कागल) ते शंकरवाडी सुमारे तीन किलोमीटर अंतर कालव्याचे काँक्रिट अस्तरीकरण झाल्याने शेतकरी सुखावले; मात्र चारच दिवसांपूर्वी कालव्याला आस्तरीकरणानंतर पाणी सोडले अन् ये रे माझ्या मागल्या प्रमाणे शेंडूर गैबी ते शंकरवाडी दरम्यान आस्तरीकरण केलेल्या कालव्याच्या दुतर्फा शेकडो एकर जमिनीत पाणीच पाणी झाल्याने शेतकरीवर्गातून संताप व्यक्त होत आहे.
कालव्याचे काँक्रिट अस्तरीकरण हे निकृष्ट दर्जाचे झाल्यानेच परत आमच्या शेतात पाणीच पाणी झाल्याने लागणी बरोबरच उसाचे पीक वाया जाण्याची भीती असून परत पाणी कालव्याला सोडण्याअगोदरच दर्जात्मक काँक्रिटकरण करावे, अन्यथा शेतकर्यांसह कागल तालुका शिवसेना कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम पूर्णपणे बंद पाडण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे व कागल तालुका
शिवसेनाप्रमुख अशोकराव पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
कालव्याचे अस्तरीकरण करताना सिमेंट, वाळू यांचे प्रमाणाच्या दर्जाबरोबरच आस्तरीकरणावर पुरेशे पाणी वापरले नसल्याने घाईगडबडीत काम उरकल्याने अस्तरीकरण एरियात परत गळती सुरू झाली असून शेंडूर येथील लाटकर मळा, बामणकी, तळ्याची पूर्व बाजू, गणेश वडा रणवरे मळा परिसरातील सुमारे शंभरबर एकरांत पाणीच पाणीझाल्याने शेतकर्यांतून संताप व्यक्त होत आहे.
पुन्हा कालव्याचे दर्जात्मक अस्तरीकरण करावे, अन्यथा काम बंद पाडण्याचा इशारा शिवसेनेसह नुकसानग्रस्त शेतकर्यांनी दिला आहे.