होमपेज › Kolhapur › राधानगरी आगाराला लागली उतरती कळा

राधानगरी आगाराला लागली उतरती कळा

Published On: Mar 01 2018 1:39AM | Last Updated: Feb 28 2018 11:34PMकौलव : राजेंद्र दा. पाटील

खासगी वाहतुकीचे वाढते आव्हान अत्यावश्यक मार्गावर असणारी गाड्यांची कमतरता प्रवाशांची दिवसागणिक घटणारी संख्या अधिकार्‍यांची अनास्था व डबघाईला आलेल्या गाड्या यामुळे एकेकाळी नफ्यात असणार्‍या राधानगरी आगाराला  उतरती कळा लागली आहे. हे आगार दरमहा लाखो रुपयांच्या तोट्यात चालले आहे. 

राधानगरी हा दुर्गम व डोंगराळ तालुका आहे. त्यामुळे पंचवीस तीस वर्षांपूर्वी या तालुक्यात दळण-वळणाच्या सोयी सुविधा अत्यल्प होत्या.  शासनाच्या धोरणाप्रमाणे 1992 साली तालुक्याला स्वतंत्र आगार अस्तित्वात आले. मात्र, हे आगार म्हणजे नव्याचे नऊ दिवस ठरले. प्राथमिक टप्प्यात दहा  बारा वर्षे हे आगार नफ्यात चालले होते. आय. एम. वन्यालोलू हे आगार व्यवस्थापक असताना हे आगार प्रगतीपथावर होते. मात्र, विविध कारणांनी या आगाराला अक्षरशः घरघरच लागली आहे. गेल्या काही वर्षांत तर हे आगार तोट्यात गेले आहे. तालुक्याची भौगोलिक रचनाच डोंगराळ आहे. त्यामुळे धामोड, म्हासुर्ली खोरा, वाकीघोल दाजीपूर परिसरातील विविध गावे वाड्या वस्त्यांवर अपवादानेच एस. टी. चे दर्शन घडत तालुक्यात आतिपावसामुळे व निकृष्ट कामामुळे रस्त्यांचा बोजवारा उडाला आहे. त्यातच बहुतांशी गाड्या नादुरुस्त व खिळखिळ्या झाल्या आहेत. परिणामी गाडी कुठे बंद पडेल याची शाश्‍वती नसते. आगाराला नवीन गाडीच मिळालेली नाही. उलट उपलब्ध गाड्यांपैकी पंधरा गाड्या दुरुस्त करून वापरल्या जात आहेत. 

आगाराकडे केवळ 55 गाड्या असून 52 मार्गांवर त्या धावतात. प्रत्येकी 135 चालक व वाहकांची गरज असताना  प्रत्येकी 122 कार्यरत आहेत. त्यामुळे कोणी आजारी पडला अथवा रजेवर गेले तर फेरी रद्द करण्याशिवाय पर्यायच नसतो. देखभाल दुरुस्ती विभागाकडे 66 कर्मचारी असून आणखी दोघांची गरज आहे. तर कार्यालयाकडे नऊ कर्मचारी आहेत. कागल औद्योगिक वसाहत मार्गावर राशिवडे वाळवा मार्गावरून गाड्या धावतात. मात्र, भोगावती अथवा धामोड मार्गावरून एकही गाडी ठेवलेली नाही. हा मार्ग उत्पन्न देणारा ठरणार आहे. औद्योगिक  वसाहत मार्गावरील गाड्याही सद्या तोट्यात धावत आहेत. धामोड, म्हासुर्ली खोरा, वाकीघोलसह सरवडे परिसरातील व पूर्व भागातील विविध मार्गांवर गाड्यांची संख्या तोकडीच आहे. त्यामुळे या सर्वच मार्गावर खासगी वडाप  धारकांनी कब्जा केला आहे. एस. टी. वेळेवर येतच नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनाशिवाय पर्याय राहत नाही. परिणामी एस. टी. ला. सवलत धारकांचाच आधार राहतो. ज्या मार्गावर खासगी वाहतूक वाढली आहे. आगाराला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी सुस्थितीतील गाड्यांची गरज असून विविध मार्गांची पुनर्रचना करून जादा गाड्या सोडण्याची गजर आहे. प्रवाशांचे भारमान वाढले तरच उत्पन्नात वाढ होणार आहे. मात्र, नवीन मार्गावर गाड्या सुरू करण्यासाठी अधिकारी पातळीवरच अनास्था आहे. त्यामुळे या आगाराचे अस्तित्वच धोक्यात आले असून हे आगार तोट्याच्या नावाखाली गुंडाळले तर तालुक्यातील जनतेचे हाल होणार आहेत. गाड्या नियमित वेळेवर सोडण्याबरोबरच एस. टी. ची विश्‍वसनियता वाढवण्याची गरज अधोरेखीत झाली आहे.