होमपेज › Kolhapur › सावकारी केल्यास कारवाई करणार

सावकारी केल्यास कारवाई करणार

Published On: Feb 11 2018 1:55AM | Last Updated: Feb 10 2018 11:15PMकागल : बा. ल. वंदूरकर

कर्मचार्‍यांच्या आर्थिक अगतिकतेचा गैरफायदा घेऊन अनधिकृतपणे खासगी सावकारी करणार्‍या एस.टी. महामंडळातील  काही तथाकथित अधिकारी, कर्मचार्‍यांवर  कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे आदेश महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागाने काढले आहेत. यामुळे एस.टी.च्या सर्वसामान्य कामगारांचे आर्थिक शोषण करणार्‍या सावकारीला लगाम बसणार 
आहे.

राज्यात एस.टी. महामंडळामध्ये सुमारे 1 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी त्यांची मध्यवर्ती स्वरूपाची एस.टी. कर्मचारी सहकारी बँक अस्तित्वात आहे, तसेच स्थानिक पातळीवर काही कर्मचार्‍यांनी एकत्र येऊन सहकारी पतसंस्थांची स्थापना केली आहे. याबरोबरच एस.टी.च्या कर्मचार्‍यांना त्यांच्या वेतनावर आधारित सरकारी व सहकारी बँकांतून हा पतपुरवठा केला जातो, असे असताना कर्मचार्‍यांच्या अज्ञानाचा व त्यांच्या आर्थिक अगतिकतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्यातीलच काही कर्मचारी व अधिकारी सावकारी करीत आहेत.

काही सावकार तर कर्मचार्‍यांना तब्बल 10 ते 30 टक्के प्रतिमहिना या व्याज दराने पैसे देत असल्याबाबत व त्यांच्या वसुलीसाठी बेकायदेशीररीत्या या कर्मचार्‍यांवर दबाव आणला जात असल्याच्या तक्रारी कर्मचार्‍यांनी परिवहनमंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याकडे केल्या होत्या. याची तत्काळ दखल घेऊन ना. रावते यांनी कर्मचार्‍यांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेऊन खासगी सावकारी करणार्‍या कर्मचारी-अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश एस.टी. प्रशासनाला दिले होते. त्यानुसार एस.टी.च्या सुरक्षा व दक्षता विभागाने तातडीने परिपत्रक काढून अशाप्रकारे अवैध पद्धतीने व्याजाने पैसे देणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक एस.टी. प्रशासनाला दिले आहेत. 

एस.टी.तील काही अधिकारी आणि कर्मचारी यांचा अवैधरीत्या ग्रामीण व शहरी भागातील एस.टी. आगारातील कर्मचार्‍यांच्या भिशीच्या नावाखाली  छुपा खासगी सावकारीचा धंदा फोफावला आहे. या सावकारीच्या पाशात अनेकजण अडकले आहेत. काही ठिकाणी तर या तथाकथित सावकारीच्या अत्याचाराविरुद्ध पोलिस ठाण्यातदेखील तक्रारी दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे, एस.टी. प्रशासनाने केलेल्या चौकशीअंती अशाप्रकारे सावकारी करणारे लोक एस.टी.चे कर्मचारी असल्याचे पुढे आले आहे. काही एस.टी.चे अधिकारी, पर्यवेक्षक आपल्या पदाचा, अधिकारांचा गैरवापर करून आर्थिकदृष्ट्या नडलेल्या कर्मचार्‍यांना व्याजाने पैसे घेण्यास प्रवृत्त करीत नंतर व्याजासाठी त्यांच्यावर अवैधरीत्या दबाव आणत असत. अशा अनधिकृत सावकारांच्या धाकदपटशाहीमुळे संबंधित कर्मचारी त्यांना टाळण्यासाठी कामावरदेखील गैरहजर राहू लागले आहेत. साहजिकच, त्याचा विपरीत परिणाम एस.टी.च्या कामकाजावर होऊ लागला आहे. असे गैरप्रकार थांबविण्याच्या हेतूने एस.टी. महामंडळाच्या आवारात बेकायदेशीर व अनधिकृतरीत्या व्याजाने पैसे देणे, घेणेबाबतचे व्यवहार करणार्‍या व्यक्तीवर भारतीय दंड संहिता महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अन्वये दखलपात्र गुन्हा नोंदविण्याचे आदेश मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी मनोज लोहिया यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.