Thu, Jan 17, 2019 16:23होमपेज › Kolhapur › जावयाची वरात, पोलिसांच्या दारात

जावयाची वरात, पोलिसांच्या दारात

Published On: May 30 2018 2:18AM | Last Updated: May 30 2018 1:54AMकोल्हापूर : प्रतिनिधी

नाकावर टिच्चून प्रेमविवाह केल्यानंतर पत्नीसमवेत रूबाबात सासूरवाडीची सफर घडवित वेगळा थाट गाजविण्याचा प्रयत्न करणार्‍या कळंबा (ता. करवीर) येथील नवरोबाला ‘एलसीबी’ने मंगळवारी ‘बुलेट’ चोरीप्रकरणी जेरबंद केले. ‘जावयाची वरात अन् पोलिस ठाण्याच्या दारात...’ याचाच प्रत्यय अनुभवाला आल्याने वधूसह नातेवाईकांना मोठा धक्का सहन करावा लागला.

जयदीप शहाजी पाटील (वय 22, मूळगाव कुरळप, ता. वाळवा. सध्या, रा. अंबाई हॉल पिछाडीस कळंबा )  असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशिरा बुलेटसह संशयिताचा पोलिसांनी ताबा घेतला.

झालं ते असं... लष्करातील निवृत्त जवानाचा पुत्र जयदीप उच्चशिक्षित आहे. नोकरीच्या शोधासाठी तीन वर्षांपूर्वी त्याने कराड गाठले. आनेवाडी टोलनाक्याजवळील मोरेवाडी येथील एका कंपनीत नोकरी मिळाली. जयदीपने मोरेवाडीतील उच्चशिक्षित तरुणीशी प्रेमविवाह केला.  वर्ष सरलं... अधिकमास निमित्ताने पत्नीसमवेत सासूरवाडीला थाटात ‘बुलेट’वरून सफर करण्याचा त्याचा बेत ठरला. त्यात लग्नाचा वाढदिवसही आल्याने त्याने मित्रांकडे विनवणी करूनही बुलेट देण्यास कोणीही तयार होईनात... हताश जयदीपने शोरूममधून नवीन बुलेट चोरण्यासाठी शनिवारी (दि.19) प्रवेशद्वाराजवळ थांबला. 

शेंडूर (ता. कागल) येथील अवधूत पंडित सुतार किरकोळ दुरुस्तीसाठी स्वत:ची बुलेट घेऊन तेथे आला होता.  जयदीपने बुलेटमध्ये काय दोष आहे? अशी विचारणा अवधूतकडे करीत त्याच्याकडून बुलेटच्या किल्ल्या घेतल्या. कंपनीचा कारागिर असावा, असा समज झालेल्या  अवधूतनेही बुलेटचा तरुणाकडे ताबा दिला. मात्र, सायंकाळपर्यंत बुलेटसह तरुणाचाही ठावठिकाणा लागेना... अखेर सुतार यांनी सायंकाळी पोलिसांत तक्रार दिली. सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयिताचा छडा लागला. चौकशीअंती जयदीप पत्नीसमवेत मोरेवाडीत असल्याचे समजले.  स. निरीक्षक युवराज आठरे यांनी मोरेवाडी गाठली. ‘स्वारी’ची सासूरवाडीत बुलेटवरून रपेट सुरू होती. बुलेटसह पोलिसांनी त्याचा ताबा घेतला. चोरलेल्या बुलेटसह जावयाचा ताबा घेतल्याची माहिती मिळताच पत्नीसह सासूरवाडीकडील मंडळींना मोठा धक्काच बसला.