Mon, May 27, 2019 00:39होमपेज › Kolhapur › पुलांच्या दुरुस्तीसाठी निधी राखीव ठेवणार

पुलांच्या दुरुस्तीसाठी निधी राखीव ठेवणार

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 13 2018 12:03AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : अनिल देशमुख

पुलांच्या दुरुस्तीसाठी आता निधी राखीव ठेवला जाणार आहे. जिल्ह्यातील रस्ते दुरुस्ती व देखभालीसाठी जो निधी उपलब्ध होईल, त्यातील 10 टक्के निधी पुलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. पुलांंसह सरकारी इमारतीच्या ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’साठीही नव्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबई-गोवा मार्गावरील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतर राज्यातील पुलांच्या देखभालीचा प्रश्‍न समोर आला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिटचे काम हाती घेतले. याकरिता ऑगस्ट 2016 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत करण्यात येणारी कार्यवाही निश्‍चित केली होती. त्यात आता सुधारणा करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश बुधवारी देण्यात आले.
पुलांच्या दुरुस्तीसाठी आता जिल्ह्यातील रस्ते दुरुस्ती व देखभालीसाठी येणार्‍या निधीतून 10 टक्के निधी वापरला जाणार आहे. प्रादेशिक विभागातील ज्या पुलांच्या दुरुस्तीचे काम 1 कोटी रुपयांपर्यंत आहे, त्या कामांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्याचे अधिकार मुख्य अभियंता यांना देण्यात आले आहेत. यासह दर पाच वर्षांनी पुलांचे ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’ केले जाणार आहे.

पुलांचे ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’ कोणाकडून करून घ्यायचे हे निश्‍चित करण्यात आले आहे. त्यानुसार 250 मीटर लांबीपर्यंतच्या पुलांचे ‘ऑडिट’ नामांकित तांत्रिक सल्लागार अथवा कंपनीकडून केले जाणार आहे. 250 ते 500 मीटर लांबीच्या पुलाचे नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून केले जाणार आहे. तर, 500 मीटरपेक्षा लांब असलेल्या पुलांचे ‘ऑडिट’ आयआयटी अथवा सीआरआय, नवी दिल्ली या संस्थेकडून केले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या इमारतीचेही स्ट्रक्‍चरल ऑडिट करणार्‍या संस्था निश्‍चित करण्यात आल्या आहेत. 2500 चौरस मीटरपेक्षा कमी क्षेत्राच्या इमारतीचे ‘ऑडिट’ नामांकित तज्ज्ञ सल्लागाराकडून करून घेता येणार आहे. तर, 2500 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्राच्या इमारतीचे ‘ऑडिट’ आयआयटी, व्हीजेटीआय, व्हीएनआयटी व सीईओपी या संस्थेकडून केले जाणार आहे.