Wed, Jan 23, 2019 02:43होमपेज › Kolhapur › सीपीआर ‘हादरले’; बोगस प्रमाणपत्रांची चौकशी 

सीपीआर ‘हादरले’; बोगस प्रमाणपत्रांची चौकशी 

Published On: Feb 09 2018 2:00AM | Last Updated: Feb 08 2018 11:49PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

सीपीआर प्रशासनाने अपंगांच्या सर्वच प्रमाणपत्रांची गतीने चौकशी सुरू केली आहे. बोगस प्रमाणपत्रे देण्यात आजी-माजी अधिकारी आणि डॉक्टरांचे हात बरबटले आहेत.सीपीआरचे कर्मचारी ‘अपंग’ या मथळ्याखाली दैनिक ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून गतीने चौकशी सुरू झाल्याने रुग्णालय हादरले आहे. 

जिल्ह्यात दिल्या गेेलेल्या अपंग प्रमाणत्रांची चौकशी करण्यासाठी सीपीआर प्रशासनाने चौकशी समिती नेमली आहे. या समितीमार्फत सखोल चौकशी केली जाणार आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णालय परिसरात बोगस प्रमाणपत्रे देणार्‍यांचा सुळसुळाट आहे. सीपीआरमध्ये अनेक कर्मचार्‍यांनी या संधीचा पुरेपूर फायदा उठविला आहे. अनेकांनी चक्क कागदोपत्री अपंगत्व दाखवून प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ देखील काहींनी घेतला आहे. बोगस प्रमाणपत्रांची चौकशी सुरू झाल्याने अशी प्रमाणपत्रे घेणार्‍यांचे आणि देणार्‍यांचे धाबे धणाणले आहेत. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त होताच सीपीआर प्रशासन कारवाईचा बडगा देखील उगारणार आहे. डिसेंबर महिन्यात प्रसूती विभागातील महिला कर्मचार्‍यांवर रुग्णालय प्रशासनाने कारवाई केल्याने अनेक कर्मचारी गांगरले होते. कारवाईत मुभा देण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली होती; पण रुग्णालय प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. 

गेल्या पंधरा दिवसांपासून सीपीआर परिसरात बोगस प्रमाणपत्रे देणारे आणि घेणारे महाभाग कोण? या चर्चेला उधान आले आहे. परिसरातील चहाच्या टपरीवर देखील बोगस प्रमाणपत्रांची चर्चा रंगू लागली आहे. पतित पावन संघटना देखील सीपीआरवर लक्ष ठेवून आहे. बोगस प्रमाणपत्रांचा शोध घेऊन, संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना दिले आहे. गतीने चौकशी करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. एका बाजूला सीपीआरचे प्रशासन दर्जेदार सेवा आणि निधीसाठी मंत्रालयाच्या पायर्‍या झिजवत आहे. तर काहीजण रुग्णालयात चिरिमिरीसाठी लाचारी पत्करून रुग्णालयास बदनाम करत आहेत.