Mon, Apr 22, 2019 12:26होमपेज › Kolhapur › रक्तपेढी बंद करण्याचा मनपाचा घाट

रक्तपेढी बंद करण्याचा मनपाचा घाट

Published On: Jun 08 2018 1:22AM | Last Updated: Jun 08 2018 12:31AMकोल्हापूर: प्रतिनिधी 

गरजू रुग्णांना जीवनदायीनी ठरत असलेली महापालिकेची रक्तपेढी बंद करण्याचा घाट घातला जात आहे. उत्पन्न नसल्याचे कारण पुढे करून महापालिका प्रशासनानेच त्यासंदर्भात प्रस्ताव तयार केला आहे. रक्तपेढी बंद झाल्यास गोरगरीब रुग्णांना खासगी रक्तपेढीतून दुप्पट, तिप्पट किमतीने रक्त पिशव्या घ्याव्या लागणार आहेत. 

महाद्वार रोड परिसरात कसबा गेटजवळ रक्तपेढी आहे. कै. श्रीमती लक्ष्मीबाई जाधव यांनी दातृत्व भावनेतून धर्मादाय दवाखान्यासाठी महापालिकेला देणगीदाखल इमारत दिली आहे. इमारतीत तळमजल्यावर धर्मादाय होमिओपॅथिक दवाखाना आहे. रक्तपेढीकडे वैद्यकीय अधिकारी -1, अधीक्षक - 1, प्रयोगशाळा- 2, स्टाफ नर्स - 1, वॉर्डबॉय - 1, शिपाई - 1, सेविका - 1 असा स्टाफ कार्यरत आहे. सध्या आस्थापनावरील मासिक खर्च 4 लाख 46 हजार इतका आहे. 

रक्तपेढीकडे पूर्ण रक्त संकलन करून मागणीनुसार पुरवठा केला जातो; परंतु आधुनिक वैद्यकीय शास्त्राप्रमाणे पूर्ण रक्ताची मागणी अत्यल्प झाल्याने रक्तपेढीचे उत्पन्न 2015-16 मध्ये 1 लाख 32 हजार 700 रु., 2016-17 मध्ये 57 हजार 373 व 2017-18 मध्ये 26 हजार 775 रु. झाले आहे. त्यामुळे रक्तपेढीऐवजी रक्त संकलन केंद्र सुरू करणे सोयीचे होईल. त्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्र विभागीय रक्तपेढी, सीपीआर व खासगी रक्तपेढ्याकडून आवश्यकतेनुसार रक्त पिशव्यांचा साठा करून गरजेनुसार वितरित करणे सोयीचे होईल. त्यासाठी सावित्रीबाई फुले हॉस्पिटलच्या डिलीव्हरी वॉर्डच्या वरील मजल्यावर संकलन केंद्र सुरू करता येईल. त्यामुळे मनुष्यबळाची कमी लागणार असून आस्थापनावरील खर्चातही मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. तसेच संबंधित स्टाफ अन्यत्र वापरायला मिळेल, असे प्रशासनाने तयार केलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. 

रक्तपेढी बंद करू नये - सौ. सरिता मोरे

महापालिकेच्या रक्तपेढीची स्थापना 17 मे 1987 ला झाली आहे. आजअखेर रक्तपेढीतून अनेक गरजू रुग्णांना रक्त मिळून त्यांना जीवदान मिळाले आहे. माफक दरात रक्त पिशव्या मिळत असल्याने गोरगरिबांची चांगली सोय होते. शहर व परिसरात महिन्यातून किमानत चार ते पाच वेळा शिबिर आयोजित करून 100 ते 125 पिशव्या रक्त संकलन केले जाते. रक्तदात्यांचा अल्पोपहाराचा सर्व खर्च शासन करते. महापालिकेला कोणताही आर्थिक खर्च नाही. रक्तदात्यांना कार्डवर शासकीय, निमशासकीय रक्तपेढ्यात मोफत रक्त मिळू शकते. सध्या फिरंगाई हॉस्पिटल येथे दीड कोटी खर्चाची योजना राबवून ब्लड कांपोनंट सेपरेशन युनिट कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरू आहे. ती सेवा तत्काळ सुरू करावी, अशी मागणी नगरसेविका सौ. सरिता मोरे यांनी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.