Tue, Mar 26, 2019 12:12होमपेज › Kolhapur › आई..! तुझ्याकडून कौतुक हीच माझी पदवी

आई..! तुझ्याकडून कौतुक हीच माझी पदवी

Published On: Sep 05 2018 8:24AM | Last Updated: Sep 05 2018 8:24AMकोल्‍हापूर : महादेव कांबळे

आई..! आता मला आठवत नाही तुझा हात मी कधी धरला ते. पण कधी काळी धरलेला तुझा हात तो कायम तसाच आहे. तो हात निरंतर माझ्या हातात असावा असंही आता मला नेहमी वाटतं. खूप लहान असताना अगदी नकळत्या वयात तू तुझ्या कडेवर बसवून  मला शाळेत सोडलंस आणि काळजावर दगड ठेऊन तू त्या शाळेच्या बाहेर आलीस. तो क्षण आता आता मला आठवतो. परवा शाळेतल्या आठवणी तुला सांगत असताना केवढ्यांदा तरी तू हसलीस. पण त्यावेळेचे तुझ्या डोळ्यातील अश्रू आता मला पुन्‍हा आठवतात. त्यावेळी माझं शाळेत असणं हे माझ्यापेक्षा तुलाच ते सहन होणार नव्‍हतं. तरीही माझ्या शाळेसाठी तू मोठ्ठं धाडस करून, सगळ्या भावनांना आवर घालून तू त्या शाळेत सोडून आलीस. शाळेत मी एकटाच रडत होतो असं नाही, माझ्यासोबतचे अनेक मुलं-मुली रडत होती. आणि तुझ्यासारख्याच अनेकांच्या मायाळू आया दारावर उभा राहून आपल्या लेकाचा-लेकीच्या शालेय प्रवासाचा आरंभ डोळ्यादेखत बघत होत्या.

माणसाच्या आयुष्यातील पहिला गुरू, दिशादर्शक आई तुच आहेस. तसं तर जन्‍माआधीपासूनच तुझ्या गुरूपणाचे धडे तुझ्या पोटातच मिळतात. जन्‍मानंतर एक जीव स्‍वतंत्र होतो, तुझ्याशी नाळ तुटली तरी एक अविरत नातं आयुष्यभर राहतं. तुझ्या मायेपुढं मग काळ, वेळ आणि सगळ्याच मोजमापाच्या पट्ट्‌या थिट्या पडतात. 

कुणाची आई शिकली असेल नसेल माहित नाही, पण तू शिकली नाहीस याचं शाळेत कधी कधी वाईट वाटायचं. माझ्या बरोबरच्या पोरांच्या सगळ्या आयाबाया शिकलेल्या असायाच्या. शाळेत मग कसला तरी फॉर्म भरताना ते लिहावं लागायचं तेव्‍हा ती जागा मी रिकामीच सोडायचो. वाटायचं आई माझी शिकलेली हवी. त्यादिवशी मनात हुक्‍की यायची आणि मग शाळा सुटली की, तुझ्या हाताला धरून पाठीवर अक्षर गिरवताना तुलाच केवढा आनंद व्‍हायचा. तू म्‍हणायचीस माझा लेक शाळा शिकतोय ग बाई..! तू हुशार म्‍हटलेलं मला प्रचंड आवडायचं. कुठल्यातरी विद्यापीठाच्या पदवीपेक्षाही ती पदवी मला मोठी वाटायची. मग अक्षर गिरवता गिरवता तू जवळ ओढून मायेचा हात माझ्या गालावरून फिरावायचीस ना तेव्‍हा तर ते किती अद्‌भूत वाटायचं म्‍हणून सांगू. तुझ्यासारखं ते सांगता यायचं नाही अगं.

शाळेत पहिलं पाऊलं पडलं ते तुझं बोट धरूनच. किती विश्वासानं आम्‍ही पोरांनी ते पकडलेलं असतं ना. कधी सुटू नये आणि कधी चुकू नये म्‍हणून. चुकलो तरी तुला आमच्या नेमक्या वाटा माहित असतात. मग आम्‍ही शोधण्याआधीच तुच आमच्या वाटेवर हजर राहतेस. डोळ्यात अथांग मायेचा सागर घेऊन. तू जेव्‍हा समोर उभी असतेस तेव्‍हा जीवनातील सगळ्यात मोठा गुरू तुच ठरतेस. काही न बोलता, न चालता, डोळ्याच्या एकाच नजरेत अनेक भाव आणून मग तुझी भाषा आमच्याशी बोलू लागते. आई तुझ्या भाषेचं एक वेगळं भाषाशास्‍त्र आणि वेगळं सौंदर्यशास्‍त्रही आहे. कुणा संशोधकाला, भाषाअभ्यासकाला नाही समजलं तरी तुला आणि तुझ्या पोरांना ते क्षणात कळतं. नेमकं तुला काय म्‍हणायचं आहे ते. 

आई..! या एकाच शब्दात किती गोष्टी लपल्या आहेत बघ. आई, वडील, बहीण, भाऊ, मित्र, मैत्रिण, प्रेयसी, बायको, गुरू आणखी काय काय. अगदी खूप काही. आई तू कित्येक नात्यात अशी गुंफून आहेस. आता मला ते सांगता येणार नाही आणि स्‍पष्ट करूनही दाखवता येणार नाही. शाळेत असताना आईवर निबंध लिहा म्‍हटलं की, माझी आई...या दोन शब्दांनी सुरूवात केली तरी वाटायचं माझा हा निबंध पूर्ण झाला. माझी आणि मला या शब्दातून तुला जेव्‍हा गुंफण्याचा प्रयत्‍न व्‍हायचा तेव्‍हा शाळेतल्या वर्गातही तू माझ्या मागे आहेस हाच विश्वास दृढ व्‍हायचा.  तुझ्यावर किती तरी लिहावं वाटायचं त्यावेळी. पण माझी आई या शब्दानंतर जे शब्द खेळ व्‍हायचे ते अचंबित करणारे असायचे. वर्गातल्या सगळ्या मुला मुलींच्या वहीत आई तुच. पानोपानी पसरून रहायचीस आणि प्रत्येकाला तेच वाटायचं. आई आणखी कुठेतरी आहे शिल्‍ल्‍क. जी सांगायची आहे, सांगायची राहून गेली आहे. आई सांगताच यायचं नाही अगं. तू जसं ओळखतेस ना तसं मला तुझ्या मनातील ओळखताच आलं नाही कधी. समुद्राच्या किनार्‍यावरून फिरावं तसचं तुझ्या अवती भोवती फिरत राहिलो. आई ! अगं तू म्‍हणजे समुद्रच की. मग इतक्‍या लवकर कसं समजेल. म्‍हणून फिरत राहिलो, तुला शोधत राहिलो. त्या त्यावेळी तुझं रूप नवं नवंच माझ्या समोर येत राहिलं. 

आई..! प्रत्येकाचीच आई असेल ना गं, तुझ्यासारखी. आई असली तरी तू म्‍हणजे गुरू सारखीच. तुझ्या हातानंच जेव्‍हा आमचा हात आमच्या शाळेतील गुरूंच्या हातात दिलास तेव्‍हा किती विश्वासानं सोपवलंस त्यांच्याकडे. तरीही सकाळी दहा ते पाच यावेळेत तुझी काळीजमाया आमच्यावर पसरून रहायची. कधी तरी चुका व्‍हायच्या तेव्‍हा वडीलांची उगाच भिती वाटायची. ते नसायचे तसे. रागवणारे, मारणारे पण उगाच पारंपरिक पगडा. तेही मग तुझ्यासारखेच मायाळू, ममताळू म्‍हणून भेटत राहिले दरवेळी आणि प्रत्येक क्षणी. 

आई...प्रत्येकाच्या आयुष्यात शाळा असते. तू सांगायचीस मी शाळेलाच गेली नाही, तेव्‍हा आमचा भावंडाचा तुझ्यावर विश्वास बसायचा नाही. वाटायचं तू खोटं बोलतीस. तू शाळेतच गेली नाहीस तर मग तुला सगळं येतं कसं, कळतं कसं. आमच्या मनातलं तू ओळखतीस कसं? शाळेतील भिंतीवर "आई माझा गुरू" असा तुझा सुविचार लिहिलाला असायचा. तेव्‍हातरी वाटायचं माझी आई खोटं का बोलते. मग कधी तरी कळत्या न कळत्‍या वयात समजू लागलं, तेव्‍हा मात्र तू शिकली नसलीस तरी तुझं एक शास्‍त्र आहे. जीवनाचं मोठं तत्‍वज्ञान तुझ्यात आहे. हे जेव्‍हा कळालं तेव्‍हा तुझ्या शिक्षणाचा आणि माझ्या आयुष्याचा काडीमात्र संबंध राहिला नाही, किंवा तुझं शिक्षण कधी आडही आलं नाही. शिकत राहिलो असलो तरी चार बुकंही न शिकलेल्या आईनं दरवेळी, दरक्षणाला एक एक नवा धडा शिकवला. मग आई माझा गुरू म्‍हणून मी कधी कुणाला सांगितले नाही पण निर्विवादपणे तेच सिद्ध होत राहिलं की, तुच माझी पहिली गुरू आहेस.