Wed, Jul 17, 2019 18:40होमपेज › Kolhapur › ब्लॉग : कोल्‍हापुरातील क्रांतिकारी शिवाजी चौकाचा इतिहास

ब्लॉग : कोल्‍हापुरातील क्रांतिकारी शिवाजी चौकाचा इतिहास

Published On: Aug 09 2018 10:44AM | Last Updated: Aug 09 2018 10:44AMकोल्हापूर : अनिरूध्द संकपाळ

स्‍वातंत्र्यासाठी भारतात महात्‍मा गांधीजींनी ब्रिटीशांना छोडो भारतचा नारा दिला आणि याचा बुलंद आवाज सार्‍या देशभर गाजत राहिला. करेंगे या मरेंगे म्‍हणत ९ ऑगस्‍ट या दिवशी चले जाव आंदोलनाला सुरूवात झाली आणि देशातही क्रांतीची सुरूवात झाली. क्रांतीची ही ज्योत कोल्‍हापुरात पसरायला वेळ लागला नाही. कोल्‍हापुरातील शिवाजी चौकात ब्रिटीशांकडून गव्हर्नर ‘वेस्ली विल्सनचा’ पूर्णाकृती संगमरवरी पुतळा उभारण्यात आला होता. आधीच ब्रिटाशांविषयी भारतीयांच्या मनात रोष होता, त्याचं कारण वेस्‍ली विल्‍सनचा पुतळा ठरला आणि कोल्‍हापुरात स्‍वातंत्र्याची ठिणगी पडली आणि कोल्‍हापूर स्‍वातंत्र्य भारताच्या इतिहासात आजरामर झाले. क्रांतिदिनानिमित्त कोल्‍हापुरातील शिवाजी चौकाचा हा इतिहास.

कोल्हापूरातील शिवाजी चौक हा कोल्हापूरातील घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा साक्षीदार आहे. याच चौकात भारताने विश्वचषक जिंकला किंवा पाकिस्तानला हरवले की, तरूणांची अलोट गर्दी होते. कोल्हापूरातील तरुण या चौकात आपला आनंद व्यक्त करतात. शिवाजी चौक हा फक्त तरुणांचा आनंद व्यक्त करण्याचे ठिकाण नाही. जगातील कोणत्याही अप्रिय घटनेचा निषेध पहिल्यांदा याच चौकात नोंदवला जातो तर कोल्हापूरशी निगडीत प्रश्नावरील आंदोलने याच शिवाजी चौकातून सुरु होतात. या सर्व अनुषंगाने हा शिवाजी चौक कोल्हापूरातील एक ऐतिहासिक चौक आहे पण, या चौकाच्या इतिहासाचा हा उत्तरार्ध आहे. कारण स्वतंत्र्यपूर्व काळापासून या शिवाजी चौकाची नोंद इतिहासात होत राहिली आहे. काय आहे या शिवाजी चौकाचा स्वातंत्र्यापूर्वीचा इतिहास?

विल्सनचा पुतळा

तर या शिवाजी चौकात स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीशांनी गव्हर्नर ‘वेस्ली विल्सनचा’ पूर्णाकृती संगमरवरी पुतळा उभारला होता.  या पुतळ्याचे उद्घाटन भारताचे तत्कालीन व्हॉईसरॉय लार्ड आयर्विन यांच्या हस्ते १९ नोव्हेंबर १९२९ रोजी करण्यात आले होते. या पुतळ्याचा आकार दसरा चौकातील शाहू माहाराजांचा पुतळ्या एवढा होता.  

गांधीजींचे १९४२ चे ‘जले जाव’ आंदोलन

९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींजींनी इंग्रजांविरुध्द चले जाव आंदोलन सुरु केले या आंदोलनाला सर्व भारतातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. मग या आंदोलनात कोल्हापूर कसे मागे राहील? या जुलमी इंग्रजांच्या गुलामीला कोल्हापूरातही  विरोध करायचा असे इथल्या दोन महिलांनी ठरवले.

विल्सनच्या ‘पुतळ्याला डांबर फासले’ 

कोल्हापूरातील दोन शूर महिला स्वातंत्र्य सैनिकांनी गुलामगीरीचा प्रतीक असलेला मोठा शुभ्र संगमरवरी  विल्सनचा पुतळा हेरला आणि या विल्सनच्या संगमरवरी पुतळ्याला डांबर फासायचे असे ठरवले. या  दोन कोल्हापूरच्या स्वातंत्र्य सौदामीनी म्हणजे सौ. भागिरथीबाई दत्तोबा तांबट आणि सौ. जयाबाई सिदलिंग हवीरे. या दोघींनी  १० ऑक्टोबर १९४२ ला दुपारी १२ बाराच्या सुमारास डांबराने भरलेली दोन मडकी विल्सनच्या पुतळ्याकडे भिरकावलीत ती डांबराने भरलेली मडकी विल्सनच्या पुतळ्यावर पडली आणि विल्सनच्या पुतळ्याला डांबर फासले गेले.  या सर्व मोहिमेत दत्तोबा तांबट आणि सदलिंग हवीरे यांनी या दोन महिला स्वातंत्र्य सैनिकांची समर्थ साथ दिली. त्यानंतर या गुन्ह्यासाठी सौ. भागिरथीबाई दत्तोबा तांबट आणि सौ. जयाबाई सिदलिंग हवीरे यांना आठ महिन्याची सक्तमजुरीची शिक्षा झाली. सौ तांबट यांनी तुरुंगात असतानाच त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. अशा प्रकारे राजबंदी स्त्री तुरुंगात प्रसुत होण्याची ही भारतातील पहिली घटना होती. त्यानंतर इंग्रज सरकारने हा पुतळा साफ करुन पुन्हा खुला केला.  

‘विल्सन नोज कट’

कोल्हापूरच्या या दोन स्वातंत्र्य सौदामिनींनी विल्सनच्या पुतळ्याला ‘डांबर फासल्यानंतर’  वर्षभराने म्हणजे १३ सप्टेंबर १९४३ ला या गुलामगीरी आणि अन्यायाचे प्रतीक असलेला पुतळा नामशेषच करायचा  या इराद्याने कोल्हापूरचे सहा तरुण पेटून उठले. या तरुणांमध्ये गंगावेशेतील स्वातंत्र्य सैनिक शामराव लहुजी पाटील, कोल्हापूरचे माजी आमदार शंकरराव माने, भुदरगडचे माजी आमदार काका गोपाळ देसाई, त्यांचे बंधू कुंडलीक गोपाळ देसाई, अबू देसाई (म्हसवे), वडणग्याचे नारायण रामचंद्र घोरपडे यांचा समावेश होता. या साहसी तरुणांनी त्या विल्सनचे डोकेच उडवण्याची योजना आखली. त्यांनी १३ सप्टेंबर १९४३ चा दिवस निवडला. कोल्हापूरचे माजी आमदार शंकरराव माने यांनी साहसी कामाची आखणी, या कामगिरीसाठी लागणाऱ्या समुग्रीची जोडणी आणि संयोजनाची जबाबदारी घेतली. त्यानंतर पुतळा फोडण्याची जबाबदारी गंगावेशेतील क्रांतिवीर शामराव लहुजी पाटील यांच्या कडे देण्यात आली. त्यानंतर पुतळा धुण्याच्या बहाण्याने पहाटे पाचच्या सुमारास हे सहा क्रांतिकारी दोन गटात विभागून पुतळ्या जवळ पोहचले. यात एक गट गस्ती पोलिसांचा आणि एक सफाई कामगारंचा असा करण्यात आला. गस्ती पथकाचे नेतृत्व नारायण घोरपडेंकडे होते. त्यांच्या मदतीची जबाबदारी अबू देसाई यांच्यावर सोपवण्यात आली. तर सफाई करणाऱ्या गटात शामराव लहुजी पाटील, काका देसाई आणि कुंडलीक देसाईंचा समावेश होता. त्यानंतर सफाई गटाने सफाईचा बहाणा करुन पुतळ्याला शिडी लावली. त्यानंतर  बादलीत लपवलेला हातोडा घेऊन शामराव लहुजी पाटील पटकन शिडीवर चढले. तर काका देसाईंनी बादलीतील पिस्तुल काढले. शामराव पाटलांनी हातोड्याचे जोरदार घाव विल्सनच्या पुतळ्याच्या कानाजवळ घातले. पण, कान तुटण्यापलिकडे काही झाले नाही. त्यानंतर आजुबाजुचे मोजच लोक आरडा ओरडा करु लागले म्हणून काका देसांईंनी पिस्तुल काढले. त्यादरम्यान शामराव पाटील पुन्हा वर चढले आणि त्यांनी विल्सनचा पुतळा विद्रुप केला. यानंतर सर्व क्रांतिकारी चप्पल लाईनच्या (पापाची तिकटी) दिशेने पळून गेले.

या घटनेची इंग्रजांनी गांभिर्याने दखल घेतली. आणि या प्रकरणी ९ संशयितांना आरोपी केले. यात शामराव लहुजी पाटील, नारायण घोरपडे, महादेव घाटगे, पांडुरंग पोवार, शंकरराव माने, महमद मुल्ला, कुंडलिक देसाई, काका देसाई, विनायक तावडे यांचा समावेश होता.  या पैकी तीन जनांवर गुन्हा दाखल केला गेला. नारायण घोरपडेंना दीड वर्षाची सक्तमजुरी आणि ५० रुपये दंड अशी शिक्षा झाली. बाकीच्या आरोपींना फरारी घोषित करण्यात आले. तर  महादेव घाटगे आणि पांडुरंग पोवार यांची निर्दोश मुक्तता करण्यात आली.

 
स्वातंत्र्याचे प्रतीक शिवाजी महाराजांचा पुतळा विराजमान ...आणि शिवाजी चौक अस्तित्वात 

या क्रांतिकारक मोहिमेनंतर ते गुलामगिरीचे प्रतीक इतके विद्रुप झाले. इंग्रजांचे नाकच कापले गेले. ते इंग्रजांच्या गुलामगिरीचे प्रतीक झाकून ठेवावे लागले. त्यानंतर १९४४ मध्ये विल्सनचा पुतळा हटवावा लागला. त्यानंतर भालजी पेंढारकरांच्या आग्रहाने आणि पुढाकाराने तेथे स्वातंत्र्याचे प्रतीक असणारा शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा विराजमान झाला. हा पुतळा बाबूराव पेंटरांनी साकारला आहे. सध्या या पुतळ्याच्या देखभालीचे काम शहाजी तरुण मंडळाकडे आहे.