Sat, Apr 20, 2019 08:16होमपेज › Kolhapur › फटाका कारखान्यात स्फोट; एक ठार 

फटाका कारखान्यात स्फोट; एक ठार 

Published On: Feb 02 2018 1:32AM | Last Updated: Feb 01 2018 9:54PMपेठवडगाव : वार्ताहर

हातकणंगले तालुक्यातील भादोले रस्त्यावरील शिकलगार ब्रदर्स यांच्या फटका कारखान्यात शक्‍तिशाली स्फोट होऊन लागलेल्या आगीत प्रकाश शिवराम सावंत (वय 56, सिद्धार्थनगर, पेठवडगाव) या कामगाराचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर शिवाजी धोंडी दबडे (58, रा. सिद्धार्थनगर) हा  होरपळून गंभीर जखमी झाला. जखमी दबडे यांना उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी 9.30 च्या सुमारास घडली. या घटनेने शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली.

दरम्यान, जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते, तहसीलदार वैशाली राजमाने यांच्यासह विविध खात्यातील अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. येथील हमिद दस्तगीर शिकलगार व कुटुंबीयांचा फटाके बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे. फटाके बनविण्याचा कारखाना भादोले ग्रामपंचायत हद्दीत  आहे. या कारखान्यात सुमारे चार ते पाच कामगार आहेत.  हमिद शिकलगार यांना गडमुडशिंगी येथे होणार्‍या यात्रेच्या निमित्ताने आतषबाजीसाठी फटाक्यांची मोठी ऑर्डर मिळाली  होती.  
प्रकाश सावंत, शिवाजी दबडे, राकेश कांबळे (पेठवडगाव), समीर शेख (लातूर) हे  सकाळी कामावर आले. हमीद शिकलगार यांनी प्रकाश सावंत व शिवाजी दबडे या दोघांना तारनळ्यात दारू ठासण्याचे काम दिले व अन्य दोघांना इतर काम करण्यास सांगून तेथून ते निघाले असताना त्याच दरम्यान अचानक प्रचंड मोठा आवाज झाला. कारखान्यातून आगीचा लोट बाहेर पडू लागला. कारखान्याच्या दरवाजाजवळ काम करीत बसलेला शिवाजी दबडे आगीच्या ज्वालांनी वेढलेल्या स्थितीत बाहेर फेकला गेला. हमिद शिकलगार यांनी धाव घेत शिवाजी दबडेंच्या शरीलाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांचाही हात होरपळला. या आवाजाने घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली आणि  त्यांनी मदतकार्य सुरू केले.  वडगाव नगरपालिका अग्‍निशामक दल व पोलिसांनीही तातडीने धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला.

आगीत भक्ष्यस्थानी पडलेल्या प्रकाश यांचा पूर्णपणे कोळसा झालेला मृतदेह बाहेर आणताच नातेवाइकांनी मोठा आक्रोश केला. गंभीर जखमी झालेल्या शिवाजी दबडे यांना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. स्फोट इतका शक्‍तिशाली होता की, सुमारे 3 किलोमीटरच्या परिघातील नागरिकांना स्फोटाची जाणीव झाली. या स्फोटात कारखाना पूर्णपणे बेचिराख झाला तर लाकडी साहित्य, संपूर्ण छत आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. बघ्यांच्या मोठ्या गर्दीमुळे मदतकार्यात अडथळा येत होता. पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांनी जमाव पांगवून मदतकार्य सुरळीत केले.

नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्ष अजय थोरात, नगरसेवक संतोष गाताडे, संतोष चव्हाण आदींनी घटनास्थळी धाव घेतली. हा स्फोट तार नळ्यामध्ये दारू ठासताना झाल्याचा जबाब जखमी शिवाजी दबडे यांनी दिला आहे. या दुर्घटनेची नोंद वडगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.