होमपेज › Kolhapur › जनता सरकारला ऑनलाईन घालवेल

जनता सरकारला ऑनलाईन घालवेल

Published On: Jun 09 2018 1:34AM | Last Updated: Jun 09 2018 12:47AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

दीड वर्षापूर्वी कर्जमाफीची घोषणा करून आजपर्यंत 13 हजार कोटींवर कर्जमाफीची रक्कम गेलेली नाही. शेतकर्‍यांबरोबरच उद्योजक, व्यापारी, सरकारी नोकरांसोबत हे सरकार सूडभावनेने वागत आहे. अशा सरकारला जनता ऑनलाईननेच घालवेल, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी लगावला. 

राष्ट्रवादी काँगे्रसच्या हल्लाबोल आंदोलनाची सांगता 10 जून रोजी पुण्यात होत आहे. त्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. तयारीचे नियोजन व्यवस्थित झाले नसल्याची नाराजी व्यक्त करून किमान दहा हजार कार्यकर्ते पुण्याला जातील, असेही  मुश्रीफ म्हणाले. 

ते म्हणाले, राष्ट्रीयकृत बँकांना विजय मल्ल्या, निरव मोदीसारखे  उद्योजक हजारो कोटी रुपये बुडवून पळून गेले. यामुळे देशाची अर्थव्यवस्थाच धोक्यात आल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगूनही त्याकडे  सरकार दुर्लक्ष करत आहे. कर्जमाफीचा तर गोंधळ अजूनही संपलेला नाही. ज्या ऑनलाईन पद्धतीने सरकारने कर्जमाफीसाठी अर्ज घेतले त्याच पध्दतीने ही जनता सरकारला ऑनलाईननेच घालवेल.

सध्याचे सरकार जाणार हे लहान मुलही आता सांगू लागले आहे, असे सांगून मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादीची स्थापना 19 वर्षांपूर्वी झाली. त्यानंतर सलग 15 वर्षे आपण सत्तेची फळे उपभोगली. गेल्या साडेतीन वर्षांपासून आपण सत्तेपासून दूर आहोत. हल्लाबोलच्या माध्यमातून या सरकारला घरी घालवण्याची तयारी सुरू असून, आपण पुन्हा सत्तेत येऊ.

हल्लाबोल आंदोलनाला जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला त्याचप्रमाणे कोल्हापूरची ताकद पुण्यात दाखवू, असे शहराध्यक्ष राजू लाटकर म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, आदिल फरास, महिला जिल्हाध्यक्षा सौ. संगीता खाडे, आर. के. पोवार यांची भाषणे झाली. सरचिटणीस अनिल साळोखे यांनी स्वागत केले. रोहीत पाटील 
यांनी आभार मानले. उपमहापौर महेश सावंत यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

खासदार महाडिक अनुपस्थित

आजच्या नियोजनाच्या बैठकीला खासदार धनंजय महाडिक उपस्थित राहतील, असे पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात महाडिक यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. कालच महाडिक यांनी आपल्याला संसदरत्न  पुरस्कार मिळाल्याची माहिती दिली. त्यावर टिप्पणी करताना मी अनभिज्ञ आहे, पण तरीही त्यांचे अभिनंदन, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला होता. या पार्श्‍वभूमीवर कोल्हापुरात असूनही महाडिक या बैठकीला येतील असे वाटत होते.  

कार्यक्रमाला माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हा बँक संचालक भय्या माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, नगरसेवक सुनील पाटील आदी उपस्थित होते. 
के.पी.-ए.वाय. जुगलबंदी

पुण्यासाठी वाहनांची सोय करण्यावरून के. पी. पाटील व ए. वाय. यांच्यात चांगलीच जुगलंबदी रंगली. वाहनांची व्यवस्था कागलमार्फत होईल, असे ए. वाय. म्हणताच त्याला माझा पाठिंबा असल्याचे के. पी. यांनी सांगितले. हाच धागा पकडून मुश्रीफ यांनी या दोघांत पुन्हा एकदा झाले म्हणा, अशी मार्मिक टिप्पणी केली.