Thu, Jun 20, 2019 02:01होमपेज › Kolhapur › भाजपच्या दोन नगरसेवकांत हमरीतुमरी

भाजपच्या दोन नगरसेवकांत हमरीतुमरी

Published On: May 20 2018 1:42AM | Last Updated: May 20 2018 12:39AMकोल्हापूरः प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) दोन नगरसेवकांत शनिवारी सकाळी चांगलीच हमरीतुमरी झाली. एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्या देण्यात आल्या. नगरसेविका अश्‍विनी बारामते, त्यांचे पती अरुण बारामते व स्वीकृत नगरसेवक किरण नकाते यांच्यात ही घटना घडली. त्यामुळे गजानन महाराज नगर व आयसोलेशन हॉस्पिटल रोड परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली नाही. 

नगरसेवक नकाते यांनी धार्मिक कार्यक्रमासाठी गजानन महाराज नगर येथील ग्राऊंडची स्वच्छता केली होती; परंतु ग्राऊंडवरील काढलेले गवत तेथेच पडून राहिल्याने पावसामुळे ते कुजून डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे नकाते यांनी सकाळी महापालिकेच्या वर्कशॉपकडे जेसीबीची मागणी केली होती. त्यानुसार काम सुरू असताना अरुण बारामते यांनीही आपल्या प्रभागात जेसीबी कामासाठी पाहिजे म्हणून नेण्याचा प्रयत्न झाला. त्यावरून बारामते व नकाते यांच्यात वादावादी झाली. त्याचे पर्यवसान हमरीतुमरीत झाले. नगरसेविका बारामते यांनीही नकाते यांना शिवीगाळ केली, तर नकाते यांचे कार्यकर्ते बारामते यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. अखेर काही वेळाने दोन्ही बाजूचे कार्यकर्ते निघून गेले. नागरिकांनी या घटनेचे मोबाईलवर रेकॉर्डिंग केल्याने ते व्हायरल झाले. परिणामी दिवसभर घटनेची चर्चा सुरू होती.