Thu, Jun 20, 2019 07:28होमपेज › Kolhapur › पाण्यासाठी पक्ष्यांची आर्त हाक...

पाण्यासाठी पक्ष्यांची आर्त हाक...

Published On: Mar 21 2018 1:41AM | Last Updated: Mar 20 2018 11:44PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कडाक्याचे ऊन आणि उष्णतेमुळे पक्ष्यांचे हाल होत आहेत. जंगलातील नैसर्गिक पाणीसाठे आटले असून, पाण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागत आहे. सामाजिक संघटनांनी पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्याची गरज आहे. ग्लोबल वॉर्मिंग, जंगलतोड, औद्योगिकीकरण यामुळे पक्ष्यांची संख्या घटल्याने चिऊ-काऊचे दर्शन दुर्मीळ बनले आहे. 

भविष्यात पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायचा असेल, तर टेरेस, अंगण, बाल्कनी अथवा जिथे पक्षी येतात त्या ठिकाणी पाण्याचे भांडे ठेवावे. उन्हाचा पारा वाढल्याने पक्ष्यांच्या जीवाची लाही लाही होऊ लागली आहे. 37 ते 38 अंशांदरम्यान तापमान  असल्याने वाढत्या उष्म्याचा परिणाम वन्यजीव व पक्ष्यांवर होत आहे. तापमानातील वाढीप्रमाणे त्यांच्या शरीरातील पाणी कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे उडताना अचानक खाली पडणे, तारांमध्ये अडकून जखमी होणे अथवा पाण्याअभावी तडफडून मरणे, असे प्रकार  घडत आहेत. चिमण्या, पारवे, कावळे, घारी, बुलबुल, कोकीळ यांच्यासह अन्य छोटे पक्षी उष्माघाताचे बळी ठरत आहेत. 

‘जिथे घर, तिथे पक्षी पाणवठा’ ही संकल्पना राबविणे गरजेचे आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील सामाजिक संघटनांनी कृत्रिम पाणवठे तयार करून पक्ष्यांची तहान भागविणे गरजेचे बनले आहे. नागरिकांनीदेखील अंगणात आणि घराच्या छतावर पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी व सोबत मूठभर धान्य ठेवावे. त्यामुळे पक्ष्यांची तहान आणि भूक भागेल. सामाजिक संघटनांनीही उद्याने, बगीचे आदी ठिकाणी झाडांवर पाणी ठेवावे. या पाण्यावर त्यांना आपली तहान भागवणे सोपे होईल. उन्हापासून पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी कृत्रिम घरटी   झाडांवर लावावीत. 

अंगणात, टेरेसवर पाणी ठेवावे उन्हामुळे पक्ष्यांचे हाल होत असल्यामुळे नागरिकांनी अंगणात व टेरेसवर पाण्याचे भांडे ठेवावे. त्यामुळे पक्ष्यांची तहान भागून त्यांची पाण्यासाठीची वणवण थांबेल. टांगलेले भांडे सोईस्कर जेव्हा पक्षी पाणी प्यायला येतात, तेव्हा मांजरी, बोके त्यांच्यावर हल्ला करतात. त्यासाठीच शक्यतो ते भांडे हँगिग स्वरूपात ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच पक्ष्यांना पाणी प्लास्टिकच्या भांड्यात ठेवावे, असे पक्षीमित्रांचे म्हणणे आहे. 

पक्षी मरण्याचे कारण...

तापमान  नियंत्रण करण्यासाठी पक्ष्यांमध्ये स्वेदग्रंथी नसतात. त्यामुळे त्यांना घाम येत नाही. अशा वेळी पक्षी त्यांच्या शरीरातली जादा उष्णता श्‍वासोच्छ्वासाद्वारे बाहेर टाकतात; पण त्यामुळे त्यांच्या हृदयाची धडधड वाढते. शरीरातील जास्त ऊर्जा खर्च झाल्यास आणि पाणी प्यायला मिळाल्यास पक्षी उष्माघाताने मरण्याचीही शक्यता असते. त्यासाठी पक्ष्यांना केवळ स्वच्छ पाणी गरजेचे असते.