होमपेज › Kolhapur › ‘भोगी’च्या खरेदीसाठी गर्दी

‘भोगी’च्या खरेदीसाठी गर्दी

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 12 2018 11:34PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

भोगीचा बाजार खरेदीसाठी आज बाजारात तोबा गर्दी झाली होती. शहरातील सर्व भाजी मंडईंमध्ये भाज्यांच्या राशी लागल्या होत्या. शनिवार दि. 13 जानेवारी रोजी साजर्‍या होणार्‍या भोगीसाठी शहरातील भाजी मंडईत हरभरा, वाटाणा, वांगी, वरणा, शेंगदाणे, कांद्याची पात, गाजर, मेथी आदी भाज्यांची हजेरी लागली होती. रात्री उशिरापर्यंत शहरातील भाजी मंडईत आदी ठिकाणी गर्दी दिसून आली. यासह संक्रांत सणाच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसून आली. 

भोगीच्या बाजारात बाजरी, राळ्याचे तांदूळ, गाजर, वाटाणा, वरणा, वांगी, हरभरा, पातीचा कांदा यासह अन्य भाज्यांची वर्णी लागली होती. बाजारात बाजरीचे तयार पीठही विक्रीसाठी उपलब्ध होते. शहरातील लक्ष्मीपुरी, शिवाजी मार्केट, रेल्वे फाटक, राजारामपुरी, कपिलतीर्थ, शिंगोशी मार्केट,  ऋणमुक्‍तेश्‍वर भाजी मंडईमध्ये सायंकाळपर्यंत खरेदीसाठी गर्दी सुरू होती. लहान- थोरांसह सर्वांची मने प्रफुल्‍लित करणार्‍या सक्रांतीसाठी तिळगुळाच्या हलव्यासह विविध वस्तूंनी बाजारपेठ फुलली आहे. तिळगूळ, रेवडी, चिक्‍की, तिळाचे लाडू रस्तोरस्ती विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. मोठमोठ्या शोरूम्समधून सजलेले काळ्या रंगातील कपडे, साड्यांनी संक्रांतीचे वातावरण निर्माण केले आहे. संक्रांत म्हणजे सूर्याचे मकर राशीत होणारे संक्रमण. या दिवशी संक्रांत साजरी केली जाते. यादिवशी सुहासिनी सुगडामध्ये या हंगामात येणारे धान्य, भाज्या उसाचे तुकडे, गूळ, तीळ, बिबे घालून संक्रांतीची पूजा करतात. सुवासिनींना हळदी कुंकवासह वाण देतात. त्यामुळे महिलांसाठी हा सण विशेष आनंदाचा असतो. 
घरोघरी तिळगूळ तसेच हलवा, तिळाचे लाडू केले जातात. घरोघरी संक्रांतीचा हलवा बनवण्याची घाई सुरू झाली आहे. आज बाजारात संक्रांतीचे सुगड खरेदीसाठीही महिलांची गर्दी झालेली दिसून आली.