Tue, Feb 18, 2020 06:41होमपेज › Kolhapur › ‘भोगावती’च्या 580 कर्मचार्‍यांना कामावर घेण्याचे आदेश

‘भोगावती’च्या 580 कर्मचार्‍यांना कामावर घेण्याचे आदेश

Published On: Jul 28 2018 1:33AM | Last Updated: Jul 28 2018 12:45AMराशिवडे : प्रतिनिधी

भोगावती सहकारी साखर कारखान्यामधील राष्ट्रवादी-शेकाप- शिवसेना सत्ताकाळात झालेल्या 580 जणांच्या महाभरतीतील कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्याचे आदेश औद्योगिक न्यायालयाच्या न्यायमूर्ती समिना खान यांनी शुक्रवारी दिला. हा निकाल कर्मचार्‍यांना उभारी देणारा असला तरी, याबाबत खुद्द राष्ट्रवादी, शेकाप व काँग्रेसनेही संदिग्धता व्यक्त केली आहे. हा वाद तीन वर्षांपासून सुरू होता.

कारखान्यावर 2010 ते 2015 दरम्यान राष्ट्रवादी-शेकाप-शिवसेनेची सत्ता होती, तर त्यानंतर दि. 25 मार्च 2016 रोजी त्रिसदस्यीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली होती. तत्कालीन संचालक मंडळाने दि. 5 नोव्हेंबर 2015 रोजी 580 कायम, हंगामी नोकरांची नियमबाह्य भरती केली होती. त्यानंतर डिसेंबर 2015मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी या भरतीबाबत न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली होती. हा वाद उच्च न्यायालयात पोहोचला होता. या वादग्रस्त भरतीबाबत औद्योगिक न्यायालयामध्ये  वादग्रस्त 580 कर्मचार्‍यांनी धाव घेतली होती. याबाबत उलटसुलट पुरावेकागदपत्रांची तपासणी, वेलफेअर अधिकार्‍यांचे जबाब आदी बाबी तपासल्यानंतर औद्योगिक न्यायालयाच्या न्यायमूर्ती समिना खान यांनी दि. 5 नोव्हेंबर 2015 रोजी सेवेत घेतलेल्या 580 कर्मचार्‍यांना सेवेत कायम करावे, असे आदेश देत त्यांचा पगार फरक दोन महिन्यांत अदा करावा, असे म्हटले आहे. शिवाय, या भरतीमधील काही त्रुटींबाबत कायदेशीर सल्ला घेऊन कारखान्याने त्याबाबत निर्णय घ्यावा, असेही म्हटले आहे. हे निकालपत्र सोमवार अथवा मंगळवारी मिळण्याची शक्यता आहे. कारखान्याच्या वतीने अ‍ॅड. टी. बी. वझे यांनी तर कर्मचार्‍यांच्या वतीने अ‍ॅड. दीपक जोशी यांनी काम पाहिले. निकालावेळी आजी-माजी संचालक, कर्मचार्‍यांनी गर्दी केली होती.