होमपेज › Kolhapur › कोल्हापूरः ‘बंद’वेळी प्रचंड दगडफेक, तोडफोड

कोल्हापूरः ‘बंद’वेळी प्रचंड दगडफेक, तोडफोड

Published On: Jan 04 2018 1:20AM | Last Updated: Jan 04 2018 8:11AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव दंगलीच्या निषेधार्थ बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदला कोल्हापुरात हिंसक वळण लागले. जमावातील हुल्लडबाजांनी सातशेवर वाहनांची प्रचंड तोडफोड, जाळपोळ केली. आंबेडकरी समाज संघटनांच्या मोर्चानंतर झालेल्या दगडफेक आणि तोडफोडीमुळे संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनीही प्रतिमोर्चा काढला. दोन्ही जमाव समोरासमोर आल्याने प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. एकमेकांवर जोरदार दगडफेक झाली. पोलिसांनी अनेक ठिकाणी लाठीमार केला. अश्रुधुराच्या दोन नळकांड्याही फोडण्यात आल्या. दगडफेकीत दोन पोलिस उपअधीक्षकांसह 15 पोलिस कर्मचारी, 20 नागरिक जखमी झाले. तर लाठीमारात सुमारे 40 जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. या सर्व प्रकाराने शहरात दिवसभर तणावाचे वातावरण होते.

आंबेडकरी समाज, पक्ष, संघटनांनी बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच शहरातील अनेक भागात व्यापारी, व्यावसायिकांनी दुकाने, व्यवहार बंद ठेवले होते. सकाळी दहाच्या सुमारास आंबेडकरी पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते बिंदू चौकात एकत्र आले. यानंतर बंदचे आवाहन करत त्यांनी फेरीला प्रारंभ केला. शिवाजी रोड, शिवाजी चौक, भाऊसिंगजी रोडमार्गे ही फेरी जोतिबा रोडवर आली. यावेळी काही सुरू असलेली दुकाने, व्यवहार कार्यकर्त्यांनी बंद पाडले.

ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते लोकांना दुकाने बंद करण्याची विनंती करत पुढे जात होते. महाद्वार चौकात आल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी सुरू असलेल्या दुकानांतील साहित्य विस्कटले. यानंतर हा जमाव बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक, तटाकडील तालीम मंडळमार्गे रंकाळा बसस्थानकावर आला. मार्गात सुरू असलेली दुकाने बंद करत, ‘जातीय तेढ निर्माण करणार्‍यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय’, ‘संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत जमाव पुढे येत होता. जमावापुढे पोलिस सुरू असलेले व्यवहार बंद करायला लावत होते, फेरीच्या मार्गावरील वाहतूकही पर्यायी मार्गाने वळवली जात होती.

रंकाळा बसस्थानकात सुरू असलेली एस. टी. वाहतूक कार्यकर्त्यांनी बंद पाडली. एका एस. टी. बसवर दगडफेक करण्यात आली. आक्रमक कार्यकर्त्यांना ज्येष्ठ नेते शांततेत पुढे जाण्याचे आवाहन करत होते. मात्र, काही हुल्लडबाज ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. या सर्व प्रकाराने काही वेळातच एस. टी. बस वाहतूक बंद करण्यात आली. यानंतर हा जमाव गंगावेस येथे आला. या ठिकाणी काही हुल्लडबाजांनी एका चारचाकी वाहनाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पापाची तिकटी, महापालिका, सीपीआर चौक, दसरा चौक, फोर्ड कॉर्नर, लक्ष्मीपुरी मंडईमार्गे हा जमाव बिंदू चौकात आला. यानंतर कार्यकर्त्यांनी बिंदू चौकात ठिय्या मांडत वाहतूक रोखून धरली.

हुल्लडबाजांची दगडफेक

दरम्यान, ताराराणी चौकातून तरुणांचा मोठा जमाव स्टेशन रोडच्या दिशेने घोषणा देत आला. या जमावाने मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील सर्व व्यवहार बंद पाडले. यावेळी काही हुल्लडबाजांनी दगडफेक केली. यानंतर त्यांनी स्टेशन रोडवरील दुकाने, हॉटेल्स्सह इमारती आणि वाहनांना लक्ष्य केले. दगडफेक करत हे हुल्लडबाज बिंदू चौकाच्या दिशेने येत होते. जमावातील ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते त्यांची समजूत काढत होते. मात्र, ते कोणाचेच ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. याचवेळी सिद्धार्थनगर परिसरातूनही जमाव बिंदू चौकाच्या दिशेने आला.

दगडफेकीनंतर केएमटी बस बंद

वेगवेगळ्या मार्गाने जमाव बिंदू चौकाच्या दिशेने येत असताना, राजारामपुरी परिसरात काही कार्यकर्त्यांनी केएमटी बसवर दगडफेक केली. यामुळे सकाळी दहानंतर शहरातील केएमटी बस वाहतूक बंद करण्यात आली. अनेक बसेस दसरा चौक मैदानात आणून लावण्यात आल्या.

वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड

बिंदू चौकात विविध भागातून आलेले जमाव एकत्र होत असतानाच एक जमाव पुन्हा शिवाजी रोडमार्गे बंदचे आवाहन करत बाहेर पडला. या मार्गावर भाकप कार्यालयासमोर उभ्या असलेल्या रिक्षावर काही कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. यानंतर रस्त्यावरील उभ्या असलेल्या बहुतांशी वाहनांना कार्यकर्त्यांनी लक्ष्य केले. रस्त्यावर लावलेल्या वाहनांवर, बंद असलेल्या दुकाने, कार्यालये, इमारतींवर दगडफेक करत हा जमाव गुजरीत आला. गुजरीतही रस्त्यावर लावण्यात आलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. वाहनांची तोडफोड करत जमाव महाद्वार रोडवर आला.

दुकानांवर दगडफेक, फलक फाडले

महाद्वार रोडवरही जमावाने दगडफेक केली. या दगडफेकीत दुकानांसह काही पक्षाच्या कार्यालयांवरही दगडफेक झाली. संघटनेच्या फलकाची मोडतोड करण्याचा प्रयत्न झाला. यामुळे भावना दुखावल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते महाद्वार रोडवर एकत्र येऊ लागले. काही वेळात गुजरी, जोतिबा रोड, महाद्वार रोड परिसरातील मोडतोड झालेल्या वाहनांचे मालक, परिसरातील नागरिकही एकत्र आले. महाद्वार रोडवर हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले.

दोन्ही जमाव आक्रमक, लाठीमार

गुजरी कॉर्नर चौकात दोन्ही जमाव समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला. त्यातून या परिसरात प्रचंड दगडफेक सुरू झाली. दोन्ही बाजूचे जमाव आक्रमक होत असल्याने पोलिसांनी लाठीमार सुरू केला. जोरदार दगडफेक आणि लाठीमार यामुळे या परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले. पोलिसांनी लाठीमार करत जमावाला पांगवले. जमाव पुन्हा बिंदू चौकात आला, तर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी महाद्वार रोडवरच ठाण मांडले. 

बिंदू चौकात एकत्र आलेल्या जमावातील बहुतांशी तरुणांनी दसरा चौकात धाव घेतली. दसरा चौकात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाल्याने पोलिस कुमक वाढवण्यात आली. जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून जात होता. यातून या परिसरात असणार्‍या एका वृत्तपत्राच्या कार्यालयावर दगडफेक झाली. यानंतर पोलिसांनी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार केला. यामुळे जमाव अधिकच संतप्त झाला. दरम्यान, हिंदुत्ववादी कार्यकर्ते शिवाजी चौकात आले. काही वेळात आणखी काही तरुणांचा मोठा गट तेथे आला. त्यानंतर सर्वजण बिंदू चौकात गेले. तेथे असलेल्या दुचाकींची काही हुल्लडबाजांनी प्रचंड तोडफोड केली.  

दोन्ही गट आमनेसामने दगडफेक, घोषणाबाजी

दरम्यान, हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर आले. बघता बघता सुमारे पाच हजारांवर जमाव कोषागार कार्यालयापर्यंत (स्वयंभू गणेश मंदिर) आला. याचवेळी दसरा चौकात थांबलेल्या आंबेडकरी समाज, पक्ष, संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरीकडे धाव घेतली. स्वयंभू गणेश मंदिर चौकात दोन्ही जमाव समोरासमोर आल्याने पुन्हा तणाव वाढला. एकमेकांकडे बघत, जोरदार घोषणाबाजी, शेरेबाजी करण्यात येत होती. त्यातूनच एकमेकांवर दगडफेक सुरू झाली. हातात जे मिळेल ते कार्यकर्ते भिरकावत होते. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अशा परिस्थितीत हुल्लडबाजांवर लाठीमार सुरू केला. पोलिसांनी पळून जाणार्‍या हुल्लडबाजांना गाठून प्रसाद दिला. सैरावैरा पळणारे कार्यकर्ते आणि पोलिस यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काहींनी बोळात, घरात, दुकानात शिरण्याच्या प्रयत्न केला. पोलिसांनी तेथून बाहेर काढून त्यांना चोप दिला. 

यावेळी दसरा चौकातून आंबेडकरी समाजाच्या काही कार्यकर्त्यांचा जमाव व्हीनस कॉर्नरच्या दिशेने गेला. काही जण दसरा चौकात थांबून होते. यामुळे पोलिसांचीही धावपळ होत होती. दसरा चौकात थांबवलेल्या केएमटी बसेसवरही तुफान दगडफेक करण्यात आली.

वाहने, दुकाने, हॉटेल्सवरजोरदार दगडफेक, तोडफोड

व्हीनस कॉर्नरकडे गेलेल्या जमावात शाहूपुरीच्या दिशेने आलेल्या जमावाची भर पडली. यातील काही हुल्लडबाजांनी या परिसरात दिसेल त्या वाहनांवर दगडफेक करत त्याची तोडफोड सुरू केली. या परिसरात प्रत्येक रस्त्यावर लावलेल्या वाहनांची नासधूस करण्यात आली. स्टेशन रोडवरील दुकाने, निवासी इमारती, दवाखाने, बेकरी, हॉटेल, कार्यालये आदी प्रत्येक इमारतीवर दगडफेक सुरू केली. हुल्लडबाज पुढे आणि पोलिस मागे असे चित्र या परिसरात तासभर होते. यामुळे थांबून-थांबून हुल्लडबाज दगडफेक, वाहनांची मोडतोड करत या परिसरात फिरत होते. यावेळी हुल्लडबाजांनी एक मोटारसायकल पेटवून दिली. सुमारे दीड तासानंतर जादा कुमक आल्यानंतर पोलिसांनी लाठीमार करत या हुल्लडबाजांना पांगवले.

हुल्लडबाजांना आवरा  पोलिसांना आवाहन

दरम्यान, रस्त्यावर लावलेली नागरिकांच्या वाहनांचीही प्रचंड मोडतोड झाल्याचे समजताच स्थानिक नगरसेवक राहुल चव्हाण घटनास्थळी आले. यावेळी परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने जमा झाले. चव्हाण यांनी पोलिसांना धारेवर धरत या हुल्लडबाजांना का आवरत नाही, तुम्हाला ते शक्य नाही का? अशी विचारणा करत आम्हीही प्रत्युत्तर देऊ शकतो, असा इशारा दिला.

हिंदुत्ववाद्यांचा प्रतिमोर्चा

पोलिसांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पाठीमागे लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यापर्यंत नेले. दरम्यान, आ. राजेश क्षीरसागर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले. यानंतर क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली प्रतिमोर्चा काढण्यात आला. लक्ष्मीपुरी, फोर्ड कॉर्नर, व्हीनस कॉर्नरमार्गे हा मोर्चा दसरा चौकात आला. मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांकडून आक्रमक घोषणा देण्यात येत होत्या. यासह बंद केलेली दुकाने उघडण्यास भाग पाडले जात होते. कार्यकर्ते थांबून दुकाने उघडत होते. 

यानंतर बिंदू चौकातून आ. क्षीरसागर, रवी इंगवले यांच्यासह इतर सर्वच मिरजकर तिकटीकडे गेले. मिरजकर तिकटी चौकातून एका मोटारसायकलवरून तीन तरुण निळा झेंडा घेऊन चालले होते. सुमारे दीडशे ते दोनशे तरुणांनी त्यांना अडविले. तिघांपैकी दोघे पळून गेले. तर एकाला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पकडून बेदम चोप दिला. क्षीरसागर व इंगवले ‘मारू नका... मारू नका...’ असे ओरडत होते. परंतु, तरुण ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर इंगवले यांनी सर्वांना अडवून त्या तरुणाची सुटका केली आणि त्याला मंगळवार पेठेच्या दिशेने पाठवून दिले. त्यानंतर सर्व जण मिरजकर तिकटी येथून पुन्हा देवल क्लबमार्गे बिंदू चौकात आले.

सीपीआर चौकात पुन्हा दोन्ही गट समोरासमोर

दीडच्या सुमारास दसरा चौकातून हा मोर्चा पुढे मिरजकर तिकटीकडे गेला. दरम्यान, दसरा चौकात या मोर्चातील काही तरुण सीपीआर चौकाकडे आले. हा जमाव सिद्धार्थनगरच्या दिशेने जात असल्याची कुणकुण लागताच पोलिसांनी सीपीआर चौक, सिद्धार्थनगर परिसरातील बंदोबस्तात वाढ केली. जमाव घोषणा देत, सीपीआर चौकात आला. यावेळी दसरा चौकात लावलेल्या दुचाकीला या जमावातील काही हुल्लडबाजांनी लक्ष्य केले. या दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर केला. यानंतर घोषणा देत जमाव टाऊन हॉल बसथांब्यासमोर आला. ही माहिती मिळताच सिद्धार्थनगरमधील महिला, युवती, मुले, नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर आली. दोन्ही जमावांना नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक होत होती.

दोन्ही गट आक्रमक

पोलिसांचा बंदोबस्त मोडून हिंदुत्ववादी जमाव सिद्धार्थनगरात घुसला. या परिसरातील फलक, फ्लेक्स्, ध्वज आदींची मोडतोड करण्यात आली. नागरिकांवरही दगडफेक करण्यात आली. नागरिकांकडूनही दगडफेक सुरू झाली. यानंतर जमाव पुन्हा सीपीआर चौकात आला. यानंतर दुपारी एक ते सांयकाळी पाच वाजेपर्यंत दोन्ही बाजूंनी जमाव समोरासमोर थांबून होता. एकमेकांना शिवीगाळ करत, घोषणा देत, जमाव एकमेकांवर दगडफेक करत होता. थांबून-थांबून जोरदार दगडफेक केली जात होती. पोलिसही लाठीमार करत होते. मात्र, दोन्ही बाजूंचा जमाव पांगत नव्हता, उलट तो जरा जरा करत पुढे सरकत होता. पोलिस या जमावांना मागे सरकवत नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होते. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. पोलिसांचे काहीही ऐकण्याची त्यांची मन:स्थिती नव्हती.

अश्रुधुराचा वापर

दरम्यान, सायंकाळी साडेचारच्या सुमारास आ. डॉ. सुजित मिणचेकर घटनास्थळी आले. त्यांनी प्रारंभी हिंदुुत्ववादी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. यानंतर ते सिद्धार्थनगर येथे आले. नागरिकांशी त्यांनी संवाद साधत त्यांनाही शांतता राखण्याचे आवाहन केले. यानंतर कार्यकर्त्यांनी माघारी जाण्याचा निर्णय घेतला. सिद्धार्थनगरमधील जमाव मागे जात असताना, सीपीआरच्या दिशेने काही हुल्लडबाजांनी सिद्धार्थनगरकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत या जमावाला पांगवले. जमावाला पांगवण्यासाठी दसरा चौकात शाहू स्मारक भवनजवळ अश्रुधुराच्या दोन नळकांड्या फोडल्या.

जनजीवन ठप्प

जमावातील काही जण दसरा चौकाकडे गेले, काही जयंती नाल्याच्या दिशेने गेले. जयंती नाल्याच्या दिशेने जाणार्‍या कार्यकर्त्यांतील काही हुल्लडबाजांनी शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयावर दगडफेक केली. कार्यालयासमोर लावलेल्या वाहनांवरही दगडफेक केली. याचवेळी जमावातील एक गट महापालिकेच्या दिशेने गेला. त्यातील काही हुल्लडबाजांनी महापालिकेवर दगडफेक केली. यामुळे शहरात रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी शहरातील तणावपूर्ण ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. करवीरचे तहसीलदार उत्तम दिघे, नायब तहसीलदार ना. रा. पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सकाळी दहानंतर शहरातील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले होते. दुचाकी वगळता रस्त्यावर फारशी वाहने दिसत नव्हती. सर्व हॉटेल, दुकाने, व्यापारी पेठा, बाजारपेठा बंद होत्या. यामुळे भाविक, पर्यटकांचेही हाल होत होते. सायंकाळी सहानंतर मात्र वातावरण सुरळीत झाले.

दोन डीवाय.एस.पी.,15 पोलिस, अन्य 60 जखमी

दरम्यान, या दगडफेकीत शहर पोलिस अधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, शाहूवाडीचे पोलिस अधीक्षक आर. आर. पाटील यांच्यासह 15 पोलिस कर्मचारी जखमी झाले. 20 नागरिकही जखमी झाले. त्यापैकी प्रमोद मनोहर सोरप (वय 19, रा. हनुमाननगर, उजळाईवाडी) याच्यावर सीपीआरमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, आणखी एकाची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीमारातही 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

आज कोल्हापूर बंद नाही : आ. क्षीरसागर

हिंदुत्ववादी आणि शिवसेनेच्या वतीने गुरुवारी कोल्हापूर बंद पुकारण्यात आल्याची शहरभर चर्चा असली तरी बंद आंदोलन केले जाणार नसल्याचे आ. राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. दंगलीमागे मोठे षड्यंत्र असण्याची शक्यता वर्तवून आ. क्षीरसागर यांनी पत्रकात शांततेचे आवाहन केले आहे. या पत्रकात आ. क्षीरसागर यांनी म्हटले आहे की, भीमा कोरेगाव येथील घटनेचे समर्थन करू शकत नाही.