Tue, Feb 18, 2020 07:24होमपेज › Kolhapur › राष्ट्रनिर्माता म्हणून डॉ. आंबेडकरांचे योगदान मोलाचे

राष्ट्रनिर्माता म्हणून डॉ. आंबेडकरांचे योगदान मोलाचे

Published On: Feb 10 2018 1:31AM | Last Updated: Feb 09 2018 11:40PMकोल्हापूर : प्रतिनिधी

ब्रिटिशांच्या ताब्यातून स्वतंत्र झालेल्या भारताला राज्यघटनेच्या माध्यमातून एक राष्ट्र म्हणून एकीकृत करण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. हे राष्ट्र सातत्याने विकास पावत राहील, अशी तरतूद घटनेमध्ये करून ठेवली, हे बाबासाहेबांचे राष्ट्रनिर्माता म्हणून मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे आयोजित ‘आधुनिक भारताच्या उभारणीत राष्ट्रनिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान’ या विषयावरील दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात तेे बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. गेल ऑम्व्हेट यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन झाले. 

यावेळी डॉ. पाटणकर म्हणाले, भारताच्या राज्यघटनेत राष्ट्रनिर्मिती व राष्ट्रउभारणीची प्रक्रिया निरंतर होत राहील, अशी व्यवस्था आहे. जगातील अन्य कोणत्याही देशाच्या घटनेमध्ये अशी तरतूद नाही. भारतीय समाजातील जात, धर्म, पंथ, लिंग आदींच्या आधारावर प्रस्थापित झालेल्या शोषण व्यवस्थेचा अंत करण्याच्या दृष्टीने राज्यघटनेत जागा निर्माण करून देण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले.
डॉ. गेल ऑम्व्हेट म्हणाल्या, जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता यांच्या बरोबरीने त्यांनी देशात निर्माण केलेल्या अनेक समस्या व दु:खे यांचे निराकरण करण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, बाबासाहेबांनी चारित्र्यसंपन्न समाजनिर्मितीचा आग्रह धरला. चारित्र्यसंपन्न समाजनिर्मितीसाठी त्या समाजातील शिक्षकही चारित्र्यसंपन्न व विनयशील असायला हवेत, यासाठी बाबासाहेब आग्रही होते. प्रास्ताविक केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले. डॉ. गिरीश मोरे यांनी आभार मानले. यावेळी धारवाड येथील डॉ. टी. ब्रह्मानंदन यांच्यासह अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, डॉ.ए.एम. गुरव, प्रा. हरिष भालेराव, प्रा. विनय कांबळे, डॉ. भगवान माने, डॉ. राजन गवस, डॉ. पी. एस. कांबळे, डॉ. गौतम कांबळे यांच्यासह विविध अधिविभागांतील शिक्षक,  विद्यार्थी  उपस्थित होते.