Mon, Jun 17, 2019 14:15होमपेज › Kolhapur › भारत पाटणकरांच्या बैठकीवर बंदीची मागणी 

भारत पाटणकरांच्या बैठकीवर बंदीची मागणी 

Published On: Jan 20 2018 5:43PM | Last Updated: Jan 20 2018 5:43PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी रविवारी (दि. २१) बोलावलेल्या ‘आद्य गणमाता अंबाबाई मुक्‍ती आंदोलन‘ विषयक बैठकीवर बंदी घाला अशा मागणीचे निवेदन बजरंग दलातर्फे शनिवारी शहर उपअधीक्षक डॉ.प्रशांत अमृतकर यांना देण्यात आले. बैठक घेण्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे, पण धार्मिक तेढ निर्माण करणारी कृती होणार नाही याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाईल असे आश्‍वासन डॉ. अमृतकर यांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना दिले. 

डॉ. भारत पाटणकर यांनी कोल्हापुरात आद्य गणमाता अंबाबाई मुक्‍ती आंदोलनाची घोषणा केली. तसेच रविवार २१ रोजी शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात बैठक बोलावली आहे. या पार्श्‍वभूमीवर बजरंग दल आणि हिंदूत्त्ववादी संघटनांनी शहर उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांची भेट घेतली. बजरंग दलाचे शहराध्यक्ष महेश उरसाल म्हणाले, डॉ. पाटणकर यांनी काही दिवसांपुर्वी अंबाबाई मंदिरात प्रवेशावरुन वाद झाला होता. रविवारी कोल्हापुरात त्यांच्यावतीने होणार्‍या बैठकीत अंबाबाई मंदिराबाबत भावना दुखावणारे वक्‍तव्ये होवू शकतात. तेव्हा पोलिसांनी खबरदारी म्हणून या बैठकीवर बंदी घालावी. बैठक होवून आंदोलनाची घोषणा झाल्यास बजरंग दलही याविरोधात आंदोलन करेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.