Fri, Apr 19, 2019 11:58होमपेज › Kolhapur › जलतरणपट्टू भक्‍तीची ‘यशोगाथे’मध्ये नोंद

जलतरणपट्टू भक्‍तीची ‘यशोगाथे’मध्ये नोंद

Published On: Aug 18 2018 1:01AM | Last Updated: Aug 18 2018 12:36AMराशिवडे : प्रतिनिधी

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाला बळ देण्यासाठी राज्य शासनाच्या महिला बालविकास मंत्रालयाच्या वतीने निवडल्या जाणार्‍या  कर्तृत्ववान मुलींच्या यशोगाथेसाठी येथील कु. भक्‍ती ऊर्फ जिजाऊ राहुल वाडकर (वय 13) या चिमुकल्या जलपरीची निवड झाली आहे. राज्यातून बारा कर्तृत्ववान मुलींची यासाठी निवड करण्यात आली असून कोल्हापूर जिल्ह्यातून कु. भक्‍तीची निवड करण्यात आली आहे.

कु. भक्‍तीचे वडील राहुल मारुती वाडकर हे हमाली करत असून शेतमजूर भूमिहिन आहेत. मुलगी झाली म्हणून नाक न मुरडता भक्‍तीवर यशाची, जिद्दीची भक्‍ती ठेवून तिला नामकरण सोहळ्यादिवशीच पाण्यात उतरविले. वयाच्या चौदाव्या दिवशी पाण्याची भीती मोडलेल्या भक्‍तीने चौथीपासूनच स्विमिंगमध्ये भरारी घेण्यास सुरुवात केली. घरची परिस्थिती बेताची असल्याने महागड्या स्विमिंग पूलमध्ये सराव न करता गावतळे आणि नदीमध्ये सरावास प्रारंभ केला. भविष्यात आपण काय तरी मोठं व्हायचं, ही जिद्द तिला गप्प बसू देत नव्हती. वयाच्या तेराव्या वर्षांपर्यंत भक्‍तीने जिल्हास्तरीय पंचवीस, राज्यस्तरीय बारा सुवर्णपदके तर नऊ रौप्यपदके मिळविली. मालवण येथील  दोन कि. मी. ची चावला खाडी दुसर्‍या क्रमांकाने पार केली आणि खरंच तिच्यात हिंमत वाढली. फ्री स्टाईल, बँकस्ट्रोक, ब्रेसस्टोक, बटरफ्लाय या चारही प्रकारामध्ये तिच्या यशाची घौडदौड सुरूच राहिली. येथीलच नागेश्‍वर हायस्कूलमध्ये 8 वी मध्ये शिक्षण घेणार्‍या भक्‍तीच्या कर्तृत्वाची दखल राज्य शासनाच्या महिला, बालविकास विभागाने घेतली.  

यांचेही योगदान!

महिला बालकल्याण मुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, कुणाल खेमणार, जि. प. अध्यक्षा शौमिका महाडिक, जिल्हा महिला समन्वयक आनंदा शिंदे यांचेही सहकार्य लाभले.