Sat, Apr 20, 2019 08:45होमपेज › Kolhapur › समाजाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी स्पर्धा असावी : चंद्रकांत पाटील 

समाजाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी स्पर्धा असावी : चंद्रकांत पाटील 

Published On: May 07 2018 2:02AM | Last Updated: May 07 2018 1:46AMकोल्हापूर : प्रतिनिधी

समाजाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी राजकीय नेत्यांची स्पर्धा असावी. निवडणुकीनंतर सर्वांनी एकत्रित येऊन काम करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. भगिनी महोत्सव 2018 मध्ये भगिनी पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. खा. धनंजय महाडिक यांनी, पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. यापूर्वीच्या मंत्र्यांनी मात्र स्वविकास केला, असा टोला लगावला. अध्यक्षस्थानी महापौर  स्वाती यवलुजे होत्या.

यावेळी समाजसेविका नसिमा हुरजूक, अभिनेत्री सुषमा शिरोमणी, अभिनेत्री सरोज सुखटणकर, उद्योजिका अश्‍विनी दानिगा, स्कूबा डायव्हर खुशी परमार यांचा ना. पाटील यांच्या हस्ते भगिनी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 11 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह, असे या पुरस्कराचे स्वरूप होते. 

ना. पाटील म्हणाले, गेल्या आठ वर्षांपासून महिलांना या महोत्सवाच्या माध्यमातून आत्मविश्‍वास, रोजगार देण्याचे काम करण्यात आले आहे. भविष्यात महिलांना अधिकाधिक सक्षम करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. यासाठी भगिनी मंचने जास्तीत जास्त उपक्रम राबवावेत.

आ. क्षीरसागर यांच्या व्यासपीठावर मला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील, गणेशोत्सवाच्या काळात आमच्या दोघांमध्ये राजकीय टोलेबाजी रंगली होती. पण, नंतर मी व क्षीरसागर काही प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी एकत्र आलो, असे सांगून ना. पाटील म्हणाले, राजकीय वैर निवडणुकीपुरतेच असावे.निवडणुका झाल्या की सर्वांनी एकत्रित येऊन काम करावे. आ. क्षीरसागर यांनी महिलांना हक्‍काचे व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच ताराराणी गारमेंट पार्कच्या माध्यमातून शेकडो महिलांना रोजगार मिळवून देण्याचे काम केले आहे.

माजी मंत्र्यांनी स्वविकास केला : खा. महाडिक

खा. महाडिक यांनीही भगिनी मंचच्या उपक्रमांचे कौतुक केले. ते म्हणाले, महिला व विशेषत: युवा पिढीने समाजातील घडणार्‍या वाईट प्रवृत्तींचा निषेध करून चांगले उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा. माझ्या कोल्हापूर मतदारसंघात रस्त्यांसाठी चारशे आठ कोटी रुपयांचा निधी देऊन पालकमंत्र्यांनी  जिल्ह्यात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. 

यापूर्वीच्या मंत्र्यांनी कोल्हापूरच्या विकासाऐवजी स्वविकासावरच अधिक भर दिल्याचा टोला त्यांनी लगावला. यावेळी महापौर स्वाती यवलुजे यांचे भाषण झाले. भगिनी मंचच्या अध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर यांनी मंचच्या कार्याचा आढावा घेतला.  कार्यक्रमास पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, परिवहन समिती सभापती राहुल चव्हाण, रवी इंगवले, यशवंत भालकर, अभिजित चव्हाण, प्रतिज्ञा उत्तुरे, सुनील मोदी, ऋतुराज क्षीरसागर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मी भाजपमध्येच असणार

आगामी निवडणुकीचा संदर्भ घेऊन ना. पाटील म्हणाले, निवडणुका होत राहतील, त्यात महाडिक कोणत्या पक्षात असतील, क्षीरसागर कोणत्या पक्षात असतील माहीत नाही. ते त्यांच्या पद्धतीने निवडणुका लढवतील. मी मात्र भाजपमध्येच असेन, असे सांगून त्यांनी महाडिक नेमक्या कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार, याचे भाकितच केले.