Wed, Jul 24, 2019 06:08होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात बेंदूर उत्साहात...

कोल्हापुरात बेंदूर उत्साहात...

Published On: Jun 29 2018 12:55AM | Last Updated: Jun 28 2018 11:50PMकोल्हापूर : प्रतिनिधी

शहर आणि परिसरात गुरुवारी बेंदूर उत्साहात साजरा झाला. ग्रामीण भागात बैलजोडीसह घरातील सर्व जनावरांची, तर शहरात मातीच्या बैलांची पूजा करण्यात आली. सकाळी सजवलेल्या बैलांच्या सवाद्य मिरवणुका काढण्यात आल्या.कसबा बावड्यात दुपारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी झाली होती.

मराठी नवीन वर्षानंतर येणारा बेंदूर हा पाहिला सण शेतकरी कुटुंबात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. बैलांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके,  शिंगाना बेगड, रिबीन तसेच मोरपीसांच्या तुर्‍यांनी सजवले होते तसेच गळ्यात कवड्या व घुंगराच्या माळा, सुगंधी फुलांचे हार, नवी वेसण, नवा कासरा, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घातले होते. तर काहींच्या पायात घुंगरू घालून सजवलेल्या बैलांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. 

 पंचगंगा नदी घाट परिसरातून निघालेल्या मिरवणूकीनंतर शहरातील विविध ठिकाणी या बैलांची ओवाळणी करून त्यांना पुरणाचा नैवेद्य खाऊ घातला. ग्रामीण भागात परंपरेनुसार बैलांकडून कर तोडण्याचा विधी करून घेण्यात आला.