Mon, Mar 18, 2019 19:21होमपेज › Kolhapur › बेळगाव- वेंगुर्ला राज्यमार्गाची चाळण

बेळगाव- वेंगुर्ला राज्यमार्गाची चाळण

Published On: Jul 23 2018 1:08AM | Last Updated: Jul 22 2018 10:59PMचंदगड : प्रतिनिधी

चंदगड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाल्याने सर्वच रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असून, तालुक्याच्या मध्यभागातून जाणारा व सतत वाहतुकीचा बेळगाव-वेंगुर्ला राज्यमार्ग तर अखेरची घटका मोजत आहे. या रस्त्यांवरून प्रवास करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहेत. या रस्त्यासह दोन महिन्यांपूर्वी केलेल्या रस्त्यांची धुळधाण झाली आहे. तीन-तीन फुटांच्या रस्त्यावरील या खड्ड्यांमध्ये पाणी साचले असून रस्त्याचा अंदाज येत नसल्याने दैनंदिन अपघातात वाढ झाली आहे.  

हलकर्णी एमआयडीसीमधील पाटणेला जाणारा रस्ता मे महिन्यात कोट्यवधी रुपये खर्चून केला होता. केवळ दोन महिन्यातच या रस्त्याची चाळण झाली आहे. बेळगांव-वेंगुर्ला रस्त्यावरील शिनोळीफाटा ते कुद्रेमनीफाटा तसेच नरेवाडी ते गुडेवाडीफाटा, कोनेवाडीफाटा ते नागणवाडीफाटा, चंदगडफाटा ते कानूर रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. तर चंदगडफाटा ते चंदगड शहरात जाणार्‍या रस्त्यावर चालत जाणेही मुश्कील झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापासून जवळच असलेल्या पोलिस वसाहतीजवळील रस्त्याची वाट लागली आहे. गंधर्वगड, पारगड, तिलारी या पर्यटनस्थळांकडे जाणार्‍या रस्त्यांची चाळण झाली आहे. कुदनूर ते हंदीगनूर, मलतवाडी ते लकिकट्टे, कुदनूर ते किटवाड, कालकुंद्री ते किटवाड, कालकुंद्री ते कागणी, बेळगांव रोड ते बुक्किहाळ, कल्याणपूरफाटा ते कल्याणपूर, गौळवाडी ते ढोलगरवाडी, होसूर ते कौलगे, कोवाड ते ढोलगरवाडी या रस्त्यांनी गेल्या दहा वर्षांत डांबर पाहिले नाही.