Thu, Nov 15, 2018 16:16होमपेज › Kolhapur › चोर्‍या करा, भिक मागा पण बँकेचे पैसे भरा

चोर्‍या करा, भिक मागा पण बँकेचे पैसे भरा

Published On: May 26 2018 1:18AM | Last Updated: May 26 2018 1:12AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

चोर्‍या करा, भिक मागा, तुम्ही कोठूनही पैसे आणा; पण क्रेडिट कार्डवर वापरलेली रक्‍कम तत्काळ भरा, अशा भाषेत धमकाविल्याप्रकरणी ग्राहकाने बँकेच्या मुंबई शाखेच्या दोन महिला कर्मचार्‍यांविरोधात पोलिसांत तक्रार दिली. श्रेयस संजय पोतदार (वय 32, रा. मंगळवार पेठ) असे तक्रारदाराचे नाव आहे. 

श्रेयस पोतदार यांना दीड वर्षापूर्वी संबंधित बँकेकडून क्रेडिट कार्ड घेतले होते. कार्डला 1 लाख 89 हजार रुपयांपर्यंत वापरास मर्यादा होती. यापैकी 1 लाख 22 हजार रुपये थकीत असल्याने बँकेच्या गोरेगाव ईस्ट येथील वसुली विभागातून शीतल नामक महिलेने फोन केला. हा फोन श्रेयस यांची पत्नी दुर्गा यांनी उचलला. फोनवर शीतल हिने पैसे तत्काळ भरा, तुम्ही कोठूनही आणा, भिक मागा, चोर्‍या करा; पण आमच्या बँकेचे पैसे भरा नाही तर तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी दिली. तर यानंतर सुप्रिया नावाच्या महिलेने फोन करून अश्‍लील भाषेत बोलून, ‘तुम्ही पैसे भरले नाही तर तुमची बदनामी करू’असे दरडावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

25 हजार रुपये भरले

बँकेतून वारंवार फोन येत असल्याने श्रेयस पोतदार यांनी बँकेच्या राजारामपुरीतील शाखेत 25 हजार रुपये भरले. रक्‍कम भरल्याची पावती आम्ही देऊ शकत नाही, असे येथील कर्मचार्‍यांनी पोतदार यांना सांगितले. यामुळे पोतदार यांनी मुंबई शाखेत फोन करून पावतीबाबत विचारणा केली असता तुम्हाला ऑनलाईन पाठविण्यात येईल असे सांगितले होते. परंतु, पावती न मिळाल्याने फसवणूक झाल्याचेही पोतदार यांनी फिर्यादीत म्हटले आहे.