Tue, May 21, 2019 18:28होमपेज › Kolhapur › ग्रामीण नागरिकांमुळे लाचखोर जाळ्यात

ग्रामीण नागरिकांमुळे लाचखोर जाळ्यात

Published On: Jul 14 2018 12:21AM | Last Updated: Jul 13 2018 11:40PMकोल्हापूर : संग्राम घुणके

दिसतोय भोळाभाबडा, ग्रामीण भागातील आहे म्हणून लाच मागितली. समोरच्या व्यक्तीने कामाच्या मोबदल्याच लाच देण्याचे मान्यही केले आणि लाचखोरच लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. ही स्थिती आहे कोल्हापूर जिल्ह्यातील. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ग्रामीण भागातच लाचखोरीविरुद्ध जागरुकता अधिक असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जिल्ह्यातील आकडेवारीनुसार ग्रामीण नागरिक लाचखोराविरुद्ध तक्रार देण्यात अधिकप्रमाणात पुढे असल्याचे चित्र आहे.

भ्रष्टाचाराच्या किडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे.  कोणी लाच मागितली तर त्याची तक्रार नागरिकांनी द्यावयाची असते. त्यानुसार लाचखोराविरोधात सापळा लावला जातो. न्यायालयात तक्रारदाराची साक्ष अत्यंत महत्त्वाची असते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीनुसार 2015 सालात 31 लाचखोर लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले. यामधील 24 तक्रारदार हे ग्रामीण भागातील व शहरी भागातील 8 तक्रारदार होते. 2016 सालात 27 लाचखोरांना लाच घेताना पकडण्यात आले. यामधील 19 तक्रारदार हे ग्रामीण भागातील व 8 तक्रारदार शहरी भागातील होते.  2017 सालात 26 लाचखोरांना पकडण्यात आले. यामधील 17  ग्रामीण भागातील व शहरी भागातील 9 तक्रारदार आहेत.  2018 सालात आतापर्यंत 18 लाचखोरांना लाच घेताना पकडण्यात आले. यामधील 13 तक्रारदार हे ग्रामीण भागातील व 6 तक्रारदार शहरी आहेत. 

जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अंतर्गत 12 तालुके व कोल्हापूर व इचलकरंजी ही शहरे येतात. यामधील इचलकंरजी शहराचा समावेश  ग्रामीण परिसरात करण्यात येतो. तसेच कोल्हापूर शहरात लाचखोरीचे जिल्हा परीषद, पोलीस ठाणे आदी शासकीय कार्यालयात गुन्हे घडले येथेही ग्रामीणमधील तक्रारदार आहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात उच्चशिक्षित नागरिकांचे प्रमाण जास्त आहेत मात्र जिल्ह्यात लाचखोराविरोधात तक्रार देण्यात ग्रामीण भागातील नागरिकांनी गेली 5 वर्षे आघाडी घेतली आहे.