Tue, May 21, 2019 22:30होमपेज › Kolhapur › प्रेमप्रकरणावरून वादावादी, दगडफेक

प्रेमप्रकरणावरून वादावादी, दगडफेक

Published On: Mar 21 2018 1:41AM | Last Updated: Mar 21 2018 12:27AMकागल : प्रतिनिधी

गोरंबे (ता. कागल) येथे प्रेमसंबंधातून तरुण-तरुणी पळून गेल्याच्या कारणावरून दोन गटात वाद होऊन, एका गटाने दुसर्‍या गटाच्या लोकांच्या घरावर तसेच पानटपरी, फोटो स्टुडिओवर रात्रीच्यावेळी  जोरदार दगडफेक करून घरादारांची नासधूस केली. यामध्ये एक महिला जखमी झाली आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. रात्रभर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. सध्या पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. अतिरिक्‍त जिल्हा पोलिसप्रमुख तिरुपती काकडे, करवीर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुरज गुरव यांनी गोरंबे गावाला भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी एकनाथ विठ्ठल कोपार्डे, योगेश बाबुराव सावंत, योगेश रामचंद्र वास्कर, राजू आनंदा जाधव व इतर दहा ते पंधरा जणांवर कागल पोलिसांत वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघाजणांना कागल पोलिसांनी अटक केली आहे.

 गावातील एका गटाचा मुलगा आणि दुसर्‍या गटाची मुलगी यांच्यात प्रेमसंबध निर्माण झाले होते. ते दोघेजण सोमवारी सकाळी गावातून पळून गेले. याबाबत फिर्यादी राजाराम धोंडी कांबळे (वय 68) यांनी कागल पोलिसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीचा राग मनात धरून फिर्यादी हे त्यांच्या दारात बसलेले असताना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुलगा-मुलगी पळून गेल्याच्या कारणावरून एका गटाने जमाव जमा करून चिडून घोषणा देत, जातीवाचक शिवीगाळ करून गावात राहू देणार नाही, असे म्हणत हातामध्ये दगड, काठ्या घेऊन गल्‍लीतील दोघांच्या घरावर जोरदार दगडफेक केली. पानटपरीचा खोका उचकटून टाकण्यात आला. फोटो स्टुडिओ फोडण्यात आला. लोखंडी कमानीवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत पदाबाई बापू कांबळे या जखमी झाल्या, तर जळणाचे लाकडी ओंडके घराच्या खापर्‍यांवर टाकून खापर्‍या फोडण्यात आल्यामुळे घरातील प्रांपचिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, ही घटना घडल्याचे समजताचा पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील व इतर अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी सर्वांची समजूत काढून वातावरण शांत केले. दरम्यान, याप्रकरणी जातीय तेढ निर्माण होऊन तणाव निर्माण होईल, असे कोणत्याही प्रकारचे कृत्य करण्यात येऊ नये. अन्यथा, कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा करवीर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुरज गुरव यांनी दिला आहे. ग्रामस्थांनी कायदा आणि सुव्यवस्था राखावी, काही जणांवर गुप्त यंत्रणेमार्फत लक्ष ठेवले आहे, असे ते गुरव म्हणाले.