Wed, Mar 27, 2019 05:57होमपेज › Kolhapur › राजकारणात अडकली पेन्शन!

राजकारणात अडकली पेन्शन!

Published On: Mar 19 2018 1:46AM | Last Updated: Mar 19 2018 1:08AMकागल : बा. ल. वंदुरकर

कागल तालुक्यातील राजकीय चढाओढीत गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील निराधार पेन्शनधारकांना टार्गेट केले जात आहे. पेन्शन मंजूर करण्यापेक्षा पेन्शन वाटप करण्यासाठी प्रतिष्ठा निर्माण केली जात आहे. प्रायोगिक तत्त्वावर आयसीआयसीआय बँकेतून वाटप करण्यात येणारी पेन्शन अचानक बंद करून इतर कोणत्याही बँकेतून वाटप करण्याचे आदेश देण्यात आले. या आदेशाची कार्यवाही सुरू होते न होते तोच आयसीआयसीआय बँकेतूनच पेन्शन वाटप करण्यात यावी, असे आदेश पुन्हा देण्यात आले. रोज नव्या आदेशाने वैतागलेल्या बँकेनेच पेन्शन वाटप करण्यासाठी आता असमर्थता दर्शविली आहे. या सर्व गोंधळामुळे निराधारांची पेन्शन गेल्या दोन-तीन महिन्यांपासून बंद झाली आहे.

निराधाराच्या खाद्यांवर बंदूक ठेवून एकमेकांना शह-प्रतिशह देण्याचे राजकारण सुरू आहे. पेन्शनकडे डोळे लावून बसलेल्या बारा हजाराहून अधिक निराधाराचे दुःख कधी दिसणार असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

प्रत्येेक निवडणुकीत संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ, इंदिरा गांधी, वृद्धापकाळ, विधवा आणि इंदिरा गांधी अपंग या योजनांच्या निराधार लाभार्थ्यांकडे राजकीय गट आणि पक्षांचे लक्ष असतेे. केवळ निराधार आहेत म्हणून त्यांच्याकडे कधीच पाहिले जात नाही. ज्यांची सत्ता त्यांचे आदेश आणि नियम ठरत आहेत. त्यामुळे निराधाराचे होणारे हाल त्यांची होणारी उपासमार, तडफड याची दखल कोणीही घेत नाही. या निराधारांना कोणताही राजकीय पक्ष, गट, नेता माहिती नाही त्यांना केवळ त्यांच्या भुकेची काळजी आहे. तरीदेखील त्यांची ससेहोलपट थांबवली जात नाही. रोज नवे संकट त्यांच्यावर येत आहेे, हे खरोखरच योग्य आहे काय, असा प्रश्‍न निर्माण होत आहे.