Fri, Apr 26, 2019 19:18होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : महापुरामुळे नदीकाठची १२०८ रोहित्र बंद

कोल्हापूर : महापुरामुळे नदीकाठची १२०८ रोहित्र बंद

Published On: Jul 16 2018 5:37PM | Last Updated: Jul 16 2018 5:36PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कोल्हापूर जिल्हयातील नद्यांना महापूर आलेला आहे. बहुतांश नद्यांनी धोकादायक पाणी पातळी गाठल्याने नदीकाठी असलेल्या महावितरणच्या विद्युत यंत्रणेलाही त्याचा फटका बसला असुन, सावधगिरी म्हणून १२०८ रोहित्रांचा वीजपुरवठा बंद करावा लागला आहे. पूरस्थिती पूर्ववत होताच सुरक्षेची खातरजमा करुन वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार आहे.

कोल्हापूर शहराला पंचगंगा नदीच्या महापुराने वेढले आहे. त्यामुळे नदीकाठी व सखल भागात असलेले ३८ रोहित्र बंद करावे लागले आहेत. ग्रामीण विभाग- १ अंतर्गत करवीर, पन्हाळा, गगनबावडा व शाहुवाडी तालुक्यातही पूरस्थिती मोठ्या प्रमाणात आहे. या तालुक्यांतील ५३२ रोहित्रांचा वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव बंद करावा लागला आहे. नदीकाठचे बहुतांश रोहित्र अंशत: पाण्यात बुडाले आहेत. त्यामुळे९३०७ शेतीग्राहक व १४२ उच्चदाब उपसा सिंचन योजनांचा वीजपुरवठा बंद करावा लागला आहे. या विभागात उच्चदाब व लघुदाबाचे मिळून ३३४ विजेचे खांब कोसळले असून, त्यापैकी २०६ खांब उभे करण्यात यश आले आहे तर १२८ खांब पाणी ओसरताच उभे केले जातील.     

ग्रामीण-२ विभागातील कागल, राधानगरी, भुदरगड या तालुक्यांमध्येही पावसाने थैमान घातले असून २३२ रोहित्र बंद करावे लागले आहेत. नदीकाठच्या १४७७ शेती ग्राहकांचा, ५ उच्चदाब उपसा सिंचन योजनांचा वीजपुरवठा बंद ठेवला आहे. उच्चदाब वीज वाहिनीचे ५ खांब देखील पडले आहेत. 

इचलकरंजी विभागात ९२, जयसिंगपूर विभाग २१८ तर गडहिंग्लज विभागातील ९६ रोहित्रांचा वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवला आहे. इचलकरंजीमध्ये लघुदाब वाहिनीचे ३ तर जयसिंगपूर विभागात १२ विजेचे खांब पुराच्या पाण्यामुळे कोसळले आहेत. 

महावितरण पुणे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांचे निर्देशानुसार मुख्य अभियंता अनिल भोसले, अधीक्षक अभियंता शैलेंद्र राठोर पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सर्व गावांचा व नागरी वस्त्यांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे अभियंते, कर्मचारी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत.