Fri, Apr 26, 2019 00:07होमपेज › Kolhapur › पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून कुटुंबास बेदम मारहाण

पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून कुटुंबास बेदम मारहाण

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 11:07PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

शिवीगाळ केल्याबाबत पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून शहाजी वसाहतीतील गुरव कुटुंबीयांना गुरुवारी रात्री मारहाण करण्यात आली. यामध्ये दोन महिलांसह चौघे जखमी झाले. याप्रकरणी राजवाडा पोलिसांनी कार्लोस ऊर्फ संदीप राजू करपे (वय 25), रमेश हणमंत पाथरुट (24), लक्ष्मण ऊर्फ गुंड्या राजू मुदगल (21), मगन राजाराम धोत्रे (30, सर्व रा. गंजीमाळ, टिंबर मार्केट) या चौघांना अटक केली. 

अधिक माहिती अशी, फिर्यादी कृष्णात गणपती गुरव आणि त्यांचा भाऊ संतोष यांचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे. गुरव कुटुंबीय शहाजी वसाहत परिसरात राहण्यास आहेत. गुरुवारी रात्री संतोष गुरव आपला ट्रक घेऊन शहाजी वसाहत येथून जात होते. यावेळी रमेश पाथरुट याने ट्रकच्या काचेवर बाटली फेकून मारली. याची विचारणा करण्यास गेलेल्या संतोषसोबत रमेश पाथरुटने वाद घातला. 

यावेळी फिर्यादी कृष्णात गुरव यांनी भांडण सोडवून संतोषला थेट पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले. संतोष गुरव हे याबाबत तक्रार करण्यास राजवाडा पोलिस ठाण्यात गेले असता, रमेश पाथरुट अन्य चार साथीदारांना घेऊन गुरव यांच्या घरात गेला. ‘तुम्हाला आता जिवंत सोडत नाही’ असे दरडावत काठीने कृष्णात गुरव, त्यांची पत्नी कुसुम गुरव, मुलगा कुणाल गुरव व भावजय सुरेखा गुरव यांना मारहाण केली. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. राजवाडा पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून चार संशयितांना तत्काळ अटक केली. त्यांना न्यायालयात उभे केले असता 25 फेबु्रवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.