होमपेज › Kolhapur › 'बसवकथा' म्हणजे समतावादी विचारांचा जागर

'बसवकथा' म्हणजे समतावादी विचारांचा जागर

Published On: Jan 24 2018 6:47PM | Last Updated: Jan 24 2018 7:51PMमहादेव कांबळे : पुढारी ऑनलाईन, कोल्‍हापूर 

समाजामध्ये समता प्रस्‍थापित व्‍हावी, समाजातील लोक गुण्यागोविंदाने नांदवेत यासाठी बसवण्णा यांनी १२ व्‍या शतकात लिंगायत समाजाची स्‍थापना केली. अवैदिक असणार्‍या या धर्मात लिंगायत समाजाची म्‍हणून एक आचारशैली, नीतीशास्‍त्र आहे. वेद, पुराण यांना बाजूला ठेवून लिंगायत धर्माने बुध्दी प्रामाण्यवादी, समतावादावर सर्व समाजाला एकतेचा आणि समानतेचा संदेश दिला. "कायकवे कैलास" म्हणजे कर्म करण्यातच स्वर्ग आहे.  प्रामुख्याने हा विचार  समाजात रुजवण्यात त्यांनी प्रयत्‍न केले. बसवण्णा यांनी सामाजिक तत्‍वज्ञान सांगितले असले तरी ते सर्व सामान्यांना समजावे, ते समाजात सोप्‍या भाषेत जावे यासाठी अॅड. शिवानंद हैबतपुरे यांनी बसवकथा हा उपक्रम हाती घेतला आहे. 

लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी लिंगायत समाज कोल्हापुरात महामोर्चा काढणार आहे. येत्या २८ जानेवारीला हा मोर्चा काढण्यात येणार असून, त्यानिमित्ताने अॅड. हैबतपुरे कोल्हापुरात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पुढारी ऑनलाईनने त्यांच्याशी बातचीत केली. 

बसवकथा म्‍हणजे बसवण्णांच्या समग्र विचारांची संगीतमय चरित्रगाथा. १२ व्‍या शतकात अंधश्रध्दा, पुरोहितशाही, अस्‍पृश्यता, स्‍त्री शोषण, कर्मकांडाची मानसिक गुलामी असतानाही बसवण्णा यांनी समानतेचा आणि एकतेचा संदेश दिला. बसवेश्वर यांचा हाच समानतेचा संदेश नव्या मांडणीसह, त्‍याला सांगितीकतेची जोड देत हैबतपूरे यांनी लिंगायत धर्मातील पुरोगामी विचार या कथेतून मांडण्याचा यशस्‍वी प्रयत्‍न केला आहे. 

कुरुळा (ता. कंदार, जि. नांदेड) येथून या बसवकथांना प्रारंभ करण्यात आला. सध्या चार वर्षे पूर्ण केलेल्या या उपक्रमाला महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून मोठा प्रतिसाद मिळत आहे. लातूर, नांदेड, मुंबई, सांगली, सातारा, बारामती, बिदर, गुलबर्गा, कुंडल संगम, येथे बसवकथांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. 

लिंगायत धर्माचा समानतेचा, एकतेचा विचार असला तरी तो बाराव्‍या शतकात रुजवणे सहजशक्‍य नव्‍हते. रुढी परंपरा मानणार्‍या त्‍या काळात बसवेश्वर यांनी सर्व रूढी परंपरा जुगारून अनुभव मंटप ही संकल्‍पना साकारून बसवण्णांनी त्या काळात लोकशाहीचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्‍न केला. धर्म म्‍हणजे काय?, त्‍याचा अर्थ काय हे सोप्या भाषेत बसवण्णांनी सांगितला आहे. जीवन पध्दती जन्‍मापासून ते मृत्‍यूपर्यंतचे संस्‍कार, लौकिक व पारलौकिक जीवनाचा दृष्टीकोन व समातेच्या तत्‍वज्ञानाच्या मांडणीला त्‍यांनी धर्म ही संकल्‍पना जोडली आहे. 

माणसा माणसात प्रेम वाढवे, समाज एक व्‍हावा हिच भावना ठेऊन बसवण्णा यांच्या कथांचे प्रभावीपणे सादरीकरण बसवकथेतून करण्यात येते. लिंगायत धर्माला स्‍वतंत्र धर्माचा दर्जा मिळावा यासाठी सध्या लिंगायत समाजाकडून महामोर्चाचे आयोजन केले आहे. लिंगायत समाजाचा हा मोर्चा लोकशाही मार्गाने यशस्‍वी व्‍हावा यासाठी विशेष प्रयत्‍न या बसवकथांच्या माध्यमातूनही करण्यात येतात. बसवकथांच्या कार्यक्रमानंतर लिंगायत समाजातील अनेक युवक युवतींनी या महामोर्चाला मोठा प्रतिसाद दिला आहे. लोकशाही मार्गाने हा लढा उभा करण्यासाठी बसवकथांचे योगदान मोठे असल्याचेही आयोजकांकडून सांगण्यात येते आणि आयोजकांमार्फत मोर्चाच्या ठिकाणी बसवकथांच्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाते. 

याबाबत ॲड. शिवानंद हैबतपूरे सांगतात की, या कथेतून वेगळं असं काही सांगितले जातं असं नाही. खरा इतिहास, महापुरूषांची वचने सांगितिक पध्दतीने लोकांसमोर मांडण्यात येतात. त्यातून बसवण्णांच्या समतेच्या विचारांचा जागर आम्‍ही करीत असतो. पुरोगामी विचार सांगत असताना रूढी, परंपरावादी विचारांचे विश्लेषणही केले जाते. महाराष्ट्रातील नांदेड जिल्‍ह्यात उस्‍माननगर , उदगिरी शहरात बसवकथांचा कार्यक्रम सुरू असताना काही रूढी परंपरावाद्यांकडून हल्‍ला करण्यात आला. याप्रकरणी उदगिरी  पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. 

बसवकथा सांगणार्‍या शिवानंद हैबतपुरे यांना अनेकवेळा जीवे मारण्याच्या धमक्‍याही देण्यात आल्या आहेत.  सांस्‍कृतिकततेची संकल्‍पना वेळ, काळानुसार बदलत असली तरी आजही बसवकथा मोठ्या आवडीने पाहिल्या जातात, ऐकल्‍या जातात. पारंपरिक पध्दतीने, पारंपरिक वाद्याच्या गजरात या कथा तेवढ्याच प्रभावीपणे नागरिकांसमोर मांडल्या जातात म्‍हणूनच या बसवकथांचा वर्गही वाढत चालला आहे. या कथा पाच, सात ते अगदी ३१ दिवसापर्यंत सांगितल्या जातात. त्याप्रमाणे बसवकथांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तीन तासाच्या कार्यक्रमामध्ये पाच हजार वर्षांची सांस्‍कृतिक पार्श्वभूमी, लिंगायत समाजाच्या इतिहासाची मांडणी केली जाते. 

बसवकथा आजही समाजात प्रभावी का ठरतात यावर हैबतपूरे सांगतात की, बसवण्णांचा विचार हाच एकमेव आधार या कथेमागे आहे. या बसवकथांच्या कार्यक्रमानंतर अनेक ठिकाणी समाजात असलेले जाती जातीतील वैमनस्‍य संपुष्ठात आले. स्‍त्री शोषणावरच्या कथांनी स्‍त्री-पुरूष समतेच्या विचारासाठी पुरक ठरणारे वातावरणनिर्मिती केली आहे. 
बसवकथा या फक्‍त बसवण्णांच्या विचारांच्याच आहेत असे नाही तर त्या सर्व जाती धर्मातील शरणांच्या, महनीय व्‍यक्‍तींच्या विचारांचा जागरच केला जातो. बौध्द, मुस्‍लिम धर्मियांकडूनही या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली जाते. बसवण्णांनी मूर्तीपूजेला कडाकडून विरोध केला आहे. या मूर्तीपूजेविरोधात बसवकथेनेही आपली भूमिका स्‍पष्ट केली आहे. या विचाराच्या समर्थनाथ मूर्तीपुजेविरोधात नागरिकांना आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत १६८ किलो पितळी मुर्ती दान करण्यात आल्या. बसवकथा ही बहुदेव उपासना विरोधी असली तरी ती भक्‍तीने परिपूर्ण असल्याचे हैबतपूरे सांगतात. 

शिवानंद हैबतपूरे ही बसवकथा सांगताना त्यांच्या साथीदारांचाही तेवढाचा मोठा हातभार असतो. नागेश पाटील, प्रा. प्रणवस्‍वामी पडोळे, अरुणस्‍वामी महाळंग्रा, चंद्रकांत तोरकडे, अनिता हैबतपूरे, संजय पाटील आदी साथीदार ही बसवकथा अधिक रंगतदार करीत प्रबोधन करतात. 

समता संदेश पदयात्रा

नांदेड जिल्‍ह्यातील कंधार ते कर्नाटकातील बसव कल्‍याण अशी दर वर्षी २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या काळात समता संदेश पदयात्रा काढण्यात येते. बाराव्‍या शतकात बसवण्णा यांनी पूर्वाश्रमीच्या महार जातीत जन्‍माला आलेल्या पेद्दी नावाच्या व्‍यक्तीला अनुभव मंटपाच्या, आचारण शुध्दीच्या बळावर मठाचे धर्मगुरू केले. पुढे त्‍यांना ऊरूलिंग पेद्दी या नावाने ओळखले जाऊ लागले. याच पेद्दी यांनी नंतरच्या काळात लिंगायत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. पेद्दी यांना धर्मगुरू करण्यात आली ही देशाच्या इतिहासातील खूप मोठी क्रांतिकारक घटना आहे. या घटनेचे स्‍मरण म्‍हणून ही समता संदेश पदयात्रा काढण्यात येते. ही पदयात्रा सात दिवस चालत राहते. सात दिवसांत २८ गावांमधून लोक प्रबोधनाचे कार्यक्रम करण्यात येतात. 

यावर्षी या समता संदेश पदयात्रेत नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या विचारांचा जागर घालण्यात आला. या पदयात्रेत लिंगायत समाजाबरोबरच इतर जाती धर्मातील अनेक नागरिक मोठ्या  संख्येने सहभागी होत असतात.