Wed, Jul 17, 2019 12:11होमपेज › Kolhapur › अनधिकृत बांधकामांच्या खरेदी-विक्रीला चाप

अनधिकृत बांधकामांच्या खरेदी-विक्रीला चाप

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 07 2018 11:37PMकागल : बा. ल. वंदूरकर

राज्यातील नागरी क्षेत्रात अनधिकृत इमारती बांधकामाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्यामुळे विकसकाकडून नियमबाह्य व पुरेशा परवानगी प्राप्‍त न करताच बांधकामे करण्यात येत आहेत. त्यामुळे शासनाच्या नगरविकास विभागाने अशा मालमत्तांची खरेदी-विक्री होऊ नये, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि नियोजन प्राधिकरण क्षेत्रातील प्रभागनिहाय अनधिकृत इमारती, बांधकामांची यादीच दुय्यम निबंधकांकडे देण्याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामांना आणि खरेदी-विक्रीला आता चांगलाच चाप बसणार आहे.

नागरी क्षेत्रात अनधिकृत इमारती बांधकामे समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. विकसकाकडून नियमबाह्य पुरेशा परवानगी प्राप्‍त न करताच बांधकाम करण्यात येते. त्यानंतर अशा सदनिका मालमत्ता विक्री करण्यात येतात. अशा व्यवहाराची नोंदणी संबंधित दुय्यम निबंधक यांच्याकडे करण्यात येते. परंतु, जेव्हा ही बांधकामे अनधिकृत असल्याचे लक्षात येते, तेव्हा नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि नियोजन प्राधिकरणाकडून निष्कासनाच्या कार्यवाहीला सामोरे जावे लागते. वास्तविक, बहुतांश गाळेधारक व सदनिकाधारकांना ते राहत असलेली इमारत अनधिकृत असल्याची माहिती नसते. यामुळे गाळेधारक व सदनिकाधारकांची फसवणूक होते. याबाबी टाळण्याकरिता यापूर्वी दिलेल्या सूचनांबरोबरच नवीन परिपत्रक जारी करून कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे.

या पार्श्‍वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था आणि नियोजन प्राधिकरण यांनी आता प्रभागनिहाय अधिकृत व अनधिकृत बांधकामची यादी सर्व्हे नंबर व विकसकाच्या नावांसह स्वतंत्ररीत्या त्यांच्या संकेतस्थळावर व वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्याचे परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.

याबाबतची फसवणूक टाळण्याकरीता अनधिकृत बांधकामाबाबत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 260, 267  व 267  अ तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 52, 53 व 54 तसेच इजर अनुषंगिक कलमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. ज्या पदनिर्देशीत अधिकार्‍यांच्या क्षेत्रात अनधिकृत बांधकामे आहेत. अशा अधिकार्‍यांवर 2009 च्या शासन निर्णयातील सुचनेनुसार कारवाई करण्यात यावी असे सुचित करण्यात आले आहे.