Fri, Apr 26, 2019 15:20होमपेज › Kolhapur › संत बाळूमामांच्या नावाचा आदमापुरात होणार जयघोष!

संत बाळूमामांच्या नावाचा आदमापुरात होणार जयघोष!

Published On: Aug 11 2018 1:20AM | Last Updated: Aug 10 2018 11:01PMमुंबई : कलर्स मराठीवर श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारच्या शुभमुहूर्तावर ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ ही मालिका सुरू होणार आहे. यानिमित्ताने आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थान येथे सोमवारी (दि. 12)  संध्याकाळी 4.00 वाजता बाळूमामांच्या भक्तांसाठी कलर्स मराठीने एक उपक्रम आयोजित केला आहे. यानिमित्ताने संत बाळूमामांच्या ओवी, भजनांचा आनंद भक्तांना पुन्हा एकदा घेता येणार आहे. संत बाळूमामांच्या जीवनप्रवासावर आधारित कीर्तन आळंदी येथील पुरुषोत्तम दादा पाटील सादर करणार आहेत. मालिकेमध्ये बाळूमामांच्या भूमिकेतील समर्थ पाटील आणि बाळूमामांची आई सुंदरा यांची भूमिका साकारणारी अंकिता पनवेलकर देखील आदमापूर येथील देवस्थानास भेट देणार आहेत. 

‘जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे’ असे म्हणतात. प्रत्येक माणसाला आयुष्यात कधी ना कधी मार्गदर्शनाची आणि पाठिंब्याची आवश्यकता भासते. विशेषतः संकटकाळी काय करावे, कोणता निर्णय घ्यावा, असा प्रश्‍न बर्‍याचदा पडतो. कधी कधी दिशाहीन झाल्यासारखे वाटते. अशा परिस्थितीमध्ये आपण परमेश्‍वराचे नामस्मरण करतो. अशावेळी परमेश्‍वर कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन भक्तांचा तारणहार बनतो. असेच थोर संत महाराष्ट्रात होऊन गेले, ज्यांनी सर्वसामान्य लोकांना भक्तिमार्ग दाखवला. ज्यांच्या शक्तीचा प्रत्यय त्यांच्या सत्कर्मातून लोकांना आला. ज्यांनी गरजू लोकांना जवळ केले, त्यांची मदत केली. भरकटलेल्यांना मार्ग दाखविले. लोकपरोपराकार्थ आणि भक्तांचे कल्याण करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचलेल्या ‘श्री सद्गुरू संत बाळूमामा’ यांचे चरित्र आणि त्यांच्यातील दैवत्वाची प्रचिती लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

तरी आदमापूर येथे 12 ऑगस्ट रोजी दु. 3.30 वा. श्री. संत बाळूमामा देवस्थानास भेट द्या, असे आवाहन करण्यात आले आहे.