Tue, May 26, 2020 03:20होमपेज › Kolhapur › बालिंगा उपसा केंद्र सुरू होणार

बालिंगा उपसा केंद्र सुरू होणार

Published On: Aug 14 2019 12:09AM | Last Updated: Aug 14 2019 12:04AM
कोल्हापूर ः प्रतिनिधी

तब्बल नऊ दिवसांनंतर कोल्हापूर शहरातील काही भागाला पाणी पुरवठा करणारे बालिंगा उपसा केंद्र बुधवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. यावर अवलंबून असलेले ए व बी वॉर्डातील काही भाग व संपूर्ण सी आणि डी वॉर्डात दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. दरम्यान, नागदेववाडी उपसा केंद्र शनिवारी तर शिंगणापूर उपसा केंद्र पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शहराला पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होणार आहे. 

शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी येथे पाणी उपसा केंद्रे आहेत. महापुराच्या पाण्यात ही तीनही उपसा केंद्रे सुमारे पाच ते सहा फुट पुराच्या पाण्याने वेढली होती. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा ठप्प आहे. दोन दिवसांपासून पाणी ओसरू लागले आहे. त्यामुळे उपसा केंद्रे स्वच्छता व दुरूस्तीची कामे महापालिकेच्यावतीने सुरू केली आहेत.

आयुक्‍त डॉ. मल्‍लिनाथ कलशेट्टी व जल अभियंता सुरेश कुलकर्णी हे युध्दपातळीवर पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी स्मॅक व गोशिमा यांची मदत घेतली जात आहे. नगरसेवक शेखर कुसाळे, अभिषेक परांडेकर, राजु चौगुले, प्रमोद पाटील यांनी बालिंगा येथील उपसा केंद्राच्या दुरूस्तीसाठी मदत केली. त्यानुसार मंगळवारी रात्रीपर्यंत किंवा बुधवारी सकाळी दुरूस्त झाल्यास सायंकाळपासून पाणी पुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महापालिकेच्यावतीने कसबा बावडा फिल्टर हाऊस व संभाजीनगर फिल्टर हाऊस येथून 44 टँकरद्वारे शहरात 255 ठिकाणी पाण्याचा पुरवठा करण्यात आला.

दोन नगरसेवकांत एक टँकर...

गेले नऊ  दिवस पाणी नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. पाण्यासाठी नागरिक नगरसेवकांच्या घरात ठिय्या मारत आहेत. परिणामी वैतागलेले नगरसेवकही टँकरचा कब्जा सोडत नसल्याची स्थिती आहे. टँकर पळवापळवी सुरू आहे. यापुढे दोन प्रभागांत एक टँकर देण्याचा निर्णय आयुक्‍त डॉ. मल्‍लिनाथ कलशेट्टी यांनी घेतला आहे. त्याचे नियोजनही करण्यात आले आहे. 80 नगरसेवकांच्या प्रभागात 40 टँकर तर एका मोठ्या प्रभागाला 1 टँकर देण्यात आला आहे. उर्वरित टँकर अतिरिक्‍त म्हणून वापरण्यात येणार आहे. त्यानुसारच बुधवारपासून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे, असे आयुक्‍तांनी सांगितले.