Sun, Jun 16, 2019 02:33होमपेज › Kolhapur › दप्‍तराचे ओझे कधी कमी होणार?

दप्‍तराचे ओझे कधी कमी होणार?

Published On: Jul 19 2018 1:37AM | Last Updated: Jul 18 2018 11:19PMकागल : बा. ल. वंदूरकर

राज्याच्या शिक्षण विभागाने गेल्या तीन चार वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचे आदेश काढले होते. मात्र, या आदेशाची अंमलबजाणी होत नसल्याचे दिसून येत असून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिना उलटला तरी देखील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कायम आहे. 

दप्तराच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांच्या वाकलेल्या पाठीकडे पाहून दप्तराचे ओझे कमी करण्यास शिक्षण विभाग नापास झाला की, काय. अशी शंका पालक वर्गातून व्यक्‍त होत आहे.

शिक्षण विभागाने मोठा गाजावाजा करून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याच्या घोषणा केल्या. इतर घोषणे प्रमाणे ही घोषणाही हवेचत विरली काय? असा प्रश्‍न सध्या उपस्थित होत आहे. सध्या पाठीवरील दप्तरांच्या ओझ्यामुळे लहान मुले वाकली आहेत. 

शाळेच्या सुट्टीच्या दिवशी चालताना देखील विद्यार्थी पाठीवर दप्तर असल्यासारखे चालतो आहे. दप्तर त्यांच्या वयाला पेलेना असे झाले आहे. त्याबाबत नियम आणि अटी घालून देखील त्यांची फारशी अंमलबजाणी होत नसल्याचे दिसून येत आहे.

सर्व विषयांची पुस्तके, त्यांना लागणार्‍या वह्या, जेवणाचा डब्बा, खेळाचे साहित्य असे अनेक साहित्य दप्तरांमध्ये भरलेले असते. या शैक्षणिक साहित्याशिवाय सॅक  देखील चांगल्याच वजनाची असते. या सगळ्या वजनाचा भार वाहून नेताना विद्यार्थ्यांची अवस्था फारच केविलवाणी झालेली असते. हा प्रकार रोजच सुरू असतो. कधी - कधी विद्यार्थ्याने जर काही विषयांची पुस्तके शाळेत आणली नसतील तर संबंधित विषयाचे शिक्षक रागावतात. त्यामुळे शाळास्तरावरच विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळांनी कोणत्या दिवशी कोणती पुस्तके आणि वह्या आणायच्या याचे नियोजन केले तर विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी होईल. अशी अपेक्षा पालकवर्गातून व्यक्‍त होत आहे.