Sun, Jul 21, 2019 07:55होमपेज › Kolhapur › सरकारची धोरणे चुकली; राज्य आर्थिक संकटात 

सरकारची धोरणे चुकली; राज्य आर्थिक संकटात 

Published On: Mar 19 2018 1:46AM | Last Updated: Mar 19 2018 1:37AMकोल्हापूर : प्रतिनिधी

सरकारची धोरणे चुकली असून राज्य आर्थिक संकटात सापडल्याचा आरोप आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. शेतकर्‍यांपासून व्यावसायिकांपर्यंत सर्व घटक आज आर्थिक आरिष्टात असून हे सरकार बदलणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दोन आणि तीन एप्रिलला सरकारविरोधी हल्लाबोल आंदोलन आयोजित केले असून त्याच्या तयारीसाठी रविवारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

मुश्रीफ म्हणाले, एल. बी. टी. रद्द, नोटाबंदी प्रकरणांमुळे सरकारची   आणि सर्वसामान्यांचीही मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. सरकारने दिलेली आश्‍वासने भ्रमाचा भोपळा ठरल्याने सर्वसामान्यांचा भ्रमनिरास झाला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून अपवाद वगळता काँग्रेस सरकारने जेवढे कर्ज केले नाही त्याच्या चौपट कर्ज या सरकारने केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारच्या काळात एक लाख 75 हजार कोटींचे जे कर्ज  होते तेच आज चार लाख 61 हजार कोटींपर्यंत पोहोचले आहे. सरकारी कर्मचार्‍यांचे पगार आणि पेन्शनचे देणेच सरकार कसेतरी भागवत आहे. विकास कामावर फक्‍त नऊ रुपये नव्वद पैसेच सरकार खर्च करू शकते. आतापर्यंतच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांतील पोट निवडणुकीतून सरकारविरोधी भावना दिसून आली. पोट निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला. सरकारला भीक लागली असून पुढील वर्षभरात अजिबात विकास कामे होणार नाहीत, असा दावा मुश्रीफ यांनी केला. त्यामुळे या सरकारच्या विरोधात हल्लाबोल करून जनजागृतीचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. पक्षाचे नेते यानिमित्त  कोल्हापुरात येत आहेत. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मनापासून प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय.पाटील, शहराध्यक्ष राजू लाटकर, अनिल घाटगे यांची भाषणे झाली. उप महापौर सुनील पाटील, बाबुराव हजारे, भैया माने, अनिल साळोखे, आर. के. पोवार, जयकुमार शिंदे उपस्थित होते.