Mon, Aug 19, 2019 09:06होमपेज › Kolhapur › बँक अधिकार्‍यांकडे उद्या चौकशी

बँक अधिकार्‍यांकडे उद्या चौकशी

Published On: Jun 03 2018 1:14AM | Last Updated: Jun 03 2018 12:48AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

आईला, बायकोला विकून बँकेचे पैसे भागव, असा अजब सल्ला देणार्‍या रिकव्हरी विभागाच्या महिलेवर बँकेने कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले आहे. तसेच तक्रारदार श्रेयस संजय पोतदार (वय 32, रा. मंगळवार पेठ) यांनी आरबीएल बँकेच्या कोल्हापूर शाखेकडे 25 हजार भरले असताना बँक नकार देत असल्याची फिर्याद 25 मे रोजी राजवाडा पोलिसांत दिली होती. याबाबत संबंधित बँक अधिकार्‍यांकडून माहिती घेण्यासाठी त्यांना सोमवारी पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

तक्रारदार श्रेयस पोतदार यांना दीड वर्षापूर्वी आरबीएल बँकेकडून क्रेडिट कार्ड देण्यात आले होते. कार्डद्वारे त्यांनी 1 लाख 22 हजार रुपये वापरले. हे पैसे थकबाकी दाखवत असल्याने तसेच त्यांनी दिलेले धनादेश न वटल्याने बँकेच्या गोरेगाव ईस्ट येथील रिकव्हरी विभागातून शीतल नामक महिलेने फोन केला.

यावेळी संबंधित महिलेने पैसे तत्काळ भरा, तुम्ही कोठूनही आणा, भिक मागा, चोर्‍या करा, आईला व बायकोला विक अशा अर्वाच्च भाषेत बोलल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. याप्रकरणी संबंधित महिलेवर पोलिसांत गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे. 

बँकेतून वारंवार फोन येत असल्याने श्रेयस पोतदार यांनी 25 मे पूर्वी बँकेच्या राजारामपुरीतील शाखेत 25 हजार रुपये भरल्याचे पोलिसांना सांगितले होते. परंतु, रक्कम भरल्याची पावती आम्ही देऊ शकत नाही, असे येथील कर्मचार्‍यांनी पोतदार यांना सांगितले. पावती न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे फिर्यादी पोतदार यांनी फिर्यादीत म्हटले होते. याची शहानिशा करण्यासाठी बँकेतील संबंधित कर्मचारी व अधिकार्‍यांना सोमवारी राजवाडा पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आले आहे.