Thu, Mar 21, 2019 11:33होमपेज › Kolhapur › पाटाकडील-दिलबहार सामना तुल्यबळ

पाटाकडील-दिलबहार सामना तुल्यबळ

Published On: Apr 10 2018 4:55PM | Last Updated: Apr 10 2018 8:54PMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळास तोडीस तोड उत्तर देत दिलबहार तालीम मंडळाने संपूर्ण वेळ सामन्यात 1-1 अशी बरोबरी राखली. यामुळे अत्यंत अटीतटीचा सामना तुल्यबळ ठरला. यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. ‘अटल चषक’ फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीतील तिसरा सामना मंगळवारी पाटाकडील तालीम ‘अ’ विरुद्ध दिलबहार तालीम ‘अ’ यांच्यात रंगला. 

शिवाजी पेठेतील श्री नेताजी तरुण मंडळातर्फे आयोजित रौप्य महोत्सवी फुटबॉल स्पर्धेंतर्गत यंदा कोल्हापूर स्पोर्टस् डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (केएसडीआय) यांच्या संयुक्‍त विद्यमाने छत्रपती शाहू स्टेडियमवर ‘अटल चषक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सामन्याचे उद्घाटन, उत्कृष्ट खेळाडूंचा सन्मान आणि फुटबॉल शौकिनांसाठीचा लकी ड्रॉ काढून बक्षिसाचे वितरण मनपाचे मुख्य लेखाधिकारी संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, संग्राम साळोखे, गोकुळचे संचालक बाबा देसाई, उदय मेयकर, कॉमन मॅन संघटनेचे बाबा इंदुलकर, हेमंत दळवी, अ‍ॅड. संपत पोवार, सौ. सुजाता पोवार, सुजाता दळवी, राधिका कुलकर्णी आदींच्या हस्ते झाले.

सर्वांचे स्वागत पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, स्पर्धा समितीचे अध्यक्ष राजू साळोखे, केएसडीएचे अध्यक्ष सुजय पित्रे, अभिनेत्री सेवा मोरे, अशोक देसाई,  प्रदीप साळोखे, राजेंद्र राऊत, उदय सुतार, दिग्विजय मळगे, राजू साठे,  बॉबी राऊत, इंद्रजित काटकर, शिरीष पाटील आदींनी केले. फुटबॉल निवेदन विजय साळोखे यांनी केले. 

मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरी

सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून जलद व आक्रमक खेळाचा अवलंब करण्यात आला. आघाडीसाठी चढायांचा अवलंब केला. पाटाकडीलच्या ऋषीकेश मेथे-पाटील, ओंकार जाधव, अकिम, अक्षय मेथे-पाटील, वृषभ ढेरे  यांनी गोलसाठी लागोपाठ चढाया सुरू ठेवल्या. मात्र फिनिशिंग अभावी त्यांना अपयश आले. दिलबहारकडूनही इचीबेरी इमॅन्युअल, करण चव्हाण-बंदरे, निखिल जाधव, जावेद जमादार, अनिकेत तोरस्कर यांनी गोलसाठी जोरदार प्रयत्न केले, पण पाटाकडीलच्या भक्‍कम बचावामुळे त्यांना गोल करता आला नाही. यामुळे मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत झाला.  

उत्तरार्धात 1-1 बरोबरी

यामुळे उत्तरार्धात सामन्याची चुरस अधिकच वाढली. दोन्ही संघांकडून आघाडीसाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले. 76 व्या मिनिटाला पाटाकडीलच्या ओंकार जाधव, अकिम, अक्षय मेथे-पाटील यांच्या संयुक्‍त चढाईत ऋषीकेश मेथे-पाटीलने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवत उत्कृष्ट गोल नोंदवत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. एका गोलने पिछाडीवर असणार्‍या दिलबहारने गोल फेडण्यासाठी योजनाबद्ध चालींसह चढाया तीव्र केल्या. यात त्यांना 86 व्या मिनिटाला यश आले. सचिन पाटील व करण चव्हाण-बंदरेच्या संयुक्‍त चढाईत गोलरक्षक विशाल नारायणपुरेला बॉल नियंत्रणात ठेवता न आल्याने संधीचा पुरेपूर फायदा उठवत इमॅन्युअल इचीबेरीने गोल नोंदवत सामना 1-1 असा बरोबरीत केला. उर्वरित वेळेत दोन्ही संघांना आघाडी न मिळाल्याने सामना बरोबरीत सुटला.

पोलिसांच्या कारवाईचा ‘फुसका बार’

दिलबहार विरुद्ध पाटाकडील यांच्यातील अटीतटीची लढत असल्याने मैदानात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सामन्यापूर्वी दोन्ही संघाचे प्रशिक्षक-संघव्यवस्थापक यांनी आपापल्या समर्थकांना सामना शांततेत व खिलाडूवृत्तीने पार पाडण्याबद्दल सूचना दिल्या. इतकेच नव्हे तर जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर यांनीही, “मैदानात अश्‍लील हवभाव, शिवगाळ आणि नाहक हुल्लडबाजी करणार्‍यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल. ती रोखण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर सरकारी कामात अडथळा अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात येईल” असा सज्जड दम भरला.

मात्र यापैकी कोणताही प्रकार पहायला मिळाला नाही. पाटाकडीलकडून पहिला गोल झाल्यानंतर त्यांच्या गॅलरीतील हुल्लडबाजांनी अक्षरश: पोलिसांच्या नाकावर टिच्चूण हुल्लडबाजी केली. प्रेक्षक गॅलरीत फटाके लावणे, मैदानात बाटल्या फेकणे, गॅलरीच्या बॅरेकेट्सवर चढून अंगावरचे कपडे काढून अश्‍लिल हवभावासह ‘जिंकले-जिंकले ऐवजी अश्‍लिल शब्द वापरून घोषणाबाजी करणे, पंच व खेळाडूंना अर्वाच्च व अश्‍लील शिव्या देणे असा प्रकार बिनधास्त सुरू होता. दिलबहारने गोल फेडल्यानंतरही हुल्लडबाजीचे प्रकार बिनधास्त सुरु होते. सामन्यादरम्यान पोलिसांनी दिलबहारच्या प्रेक्षक गॅलरीतील प्रेक्षकांना दोनवेळा हटकले. मात्र पाटाकडीलच्या गॅलरीकडे ढुंकूणही पाहिले नाही. हा दुजाभाव का? असा सवालही फुटबॉल शौकिनातून व्यक्त होत होता. दरम्यान, मैदानातील हुल्लडबाजांवर कारवाई करण्याऐवजी पोलिस निरीक्षक गुजर यांनी सामना संपल्यानंतर मैदानाबाहेर दुचाकीवरून निघालेल्या तीन मुलांवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले. याबद्दलही फुटबॉल शौकिनातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त करण्यात आल्या. 

Tags : atalfootball2018,league match,dilbahar talim mandal,patakadil talim mandal