Wed, Jul 17, 2019 18:05होमपेज › Kolhapur › रांगड्या फुटबॉलला कल्पकतेची किनार

रांगड्या फुटबॉलला कल्पकतेची किनार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : सागर यादव 

शतकी परंपरा लाभलेल्या रांगड्या फुटबॉलला कल्पकतेची नाजूक किनार लावण्याचे काम कलानगरी कोल्हापुरातील कलाकार करत आहेत. स्वत: एक खेळाडू असणारे दिग्विजय मळगे,राजू साठे, दीपक सुतार, देवरथ पवार यांच्यासारखे आर्टिस्ट संगणकासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि सामग्रीच्या माध्यमातून फुटबॉल खेळाला विविध रंगांत रंगवत आहेत. यामुळे फुटबॉलची क्रेझ अधिकच वाढत आहे. 

कलानगरी हा कोल्हापूरचा वारसा प्राचीन काळापासून जपण्यात आला आहे. अनेक चित्रकार, मूर्तिकार, शिल्पकार कलानगरी कोल्हापुरात निर्माण होऊन जगभर नावारूपाला आले आहेत. आधुनिक युगातही ही परंपरा कायम आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन कला-कल्पकता अधिक प्रगल्भ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बहुतांशी क्षेत्रात कलाकारांच्या कल्पकतेची जोड मिळाल्याशिवाय ते अपूर्णच मानले जात आहे.  क्रीडा क्षेत्रही याला अपवाद नाही.

कलाकारांना आपल्या कलागुणांची कल्पकता माडण्यासाठी क्रीडा क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. किंबहुना स्पर्धांच्या वातावरण निर्मितीपासून ते बक्षीस समारंभापर्यंतच्या प्रत्येक कामात कल्पकतेची जोड अत्यावश्यक आहे. 

स्पर्धेची माहिती क्रीडाप्रेमींपर्यंत पोहोचण्यासाठीचे विविध आकारांचे आकर्षक व कल्पक फ्लेक्स, लक्षवेधी जाहिराती, तिकीट विक्री केंद्र, निमंत्रण पत्रिका, स्वागत कमानी,  प्रत्यक्ष मैदानात आणि सभोवती वातावरण निर्मिती, खेळाडूंसाठी कीट, प्रमाणपत्रे, आकर्षक बक्षिसे आदीपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीला कल्पकतेने अधिकाधिक व्यापक बनविले जाते. कुस्ती- फुटबॉलसारख्या रांगड्या खेळांनाही कल्पकतेची नाजूक किनार लागल्याने त्यांची लोकप्रियता अधिकच वाढत चालली आहे. श्री नेताजी तरुण मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असणार्‍या ‘अटल चषक’ फुटबॉल स्पर्धेच्या निमित्तानेही कलाकाराची ही कल्पकता जपण्याची कामगिरी कलाकार करत आहेत. त्यांना सुजय पित्रे यांच्या सारख्या व्यक्तींचे मार्गदर्शन लाभत आहे.
खेळाडूंचे कीट्स, संघाचे ध्वजही  विविध स्पर्धांत सहभागी होणार्‍या खेळाडूंना आवश्यक असणार्‍या स्पोर्ट्स कीट्ससाठी विशेष परिश्रम घ्यावे लागते. यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून माहिती घेऊन विविध प्रकारच्या रंगसंगतीतून आणि आकर्षक डिझाईनच्या माध्यमातून आकर्षक स्पोर्ट्स कीट तयार करावे लागते. याशिवाय संबंधित संघांच्या ध्वजाचा रंग, त्यात आवश्यक असणार्‍या सिंबॉल, डिझाईन्स, नावे व नंबर्स आदी बारकावेही साकारावे लागतात. प्रत्येक खेळाडूच्या फिटनेसनुसार कीटमध्ये बदल करावे लागतात.  कीटबरोबरच कीट बॅग, ध्वज यासह विविध छोट्या-मोठ्या गोष्टीहीची निर्मिती करावी लागते. शिवाय डे-नाईट सामन्यानुसारही कीटमध्ये विविध प्रकार साकारावे लागतात. 


 


  •