Sat, Jun 06, 2020 18:49होमपेज › Kolhapur › पाटाकडील-फुलेवाडी सामना पावसाने थांबला

पाटाकडील-फुलेवाडी सामना पावसाने थांबला

Published On: Apr 05 2018 5:08PM | Last Updated: Apr 05 2018 7:57PMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

पाटाकडील तालीम ‘अ’ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात गुरुवारी सायंकाळी झालेल्या सामन्यातील 35 मिनिटाच्या खेळानंतर गारांसह झालेल्या पावसामुळे थांबला. सुमारे तासभर गारांचा मारा आणि पावसाच्या रिपरिपीमुळे मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने सामना रद्द करावा लागला. दरम्यान, उर्वरित वेळेचा सामना शुक्रवारी (दि. 6) दुपारी 2 वाजता खेळविण्यात येणार आहे. यानंतर वेळापत्रकानुसार नियोजित खंडोबा तालीम विरुद्ध बालगोपाल यांच्यातील लढत सायंकाळी 4 वाजता होणार आहे. दरम्यान, स्पर्धेच्या नियोजनानुसार सामना पाहायला येणार्‍या फुटबॉलप्रेमींसाठी गिफ्ट व्हाऊचर आणि महिला प्रेक्षकांसाठी पैठणी साडीचे बक्षीस देण्यात येणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन स्पर्धा संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे. 

शिवाजी पेठेतील श्री नेताजी तरुण मंडळातर्फे आयोजित रौप्यमहोत्सवी फुटबॉल स्पर्धेंतर्गत यंदा कोल्हापूर स्पोर्टस् डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (केएसडीआय) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अटल चषक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू आहे.  

स्पर्धेतील दुसरी फेरी सुरू असून यातील सहभागी आठ संघांपैकी विजेते संघ साखळी फेरीत दाखल होणार आहेत. पहिल्या सामन्यात शिवाजी मंडळवर मात करून प्रॅक्टिस ‘अ’ ने साखळी फेरीत प्रवेश केला आहे. 

गुरुवारी पीटीएम विरुद्ध फुलेवाडी यांच्यात महत्त्वपूर्ण लढत होती. मान्यवरांच्या हस्ते सामन्याचे उद्घाटन झाले. दोन्ही संघांच्या कर्णधारांना श्री नेताजी तरुण मंडळाचे अध्यक्ष राजू साळोखे यांच्या हस्ते दंडाला लावण्यासाठी ‘कॅप्टन बॅच’ देण्यात आला. यानंतर प्रत्यक्ष सामन्यास सुरुवात झाली. पाटाकडीलच्या ओंकार जाधव, ऋषीकेश मेथे-पाटील व अकिम यांनी लागोपाठ चढाया करत आघाडीसाठी प्रयत्न केले. तर फुलेवाडीकडून अरबाज पेंढारी, सूरज शिंगटे यांनी खोलवर चढाया करून प्रत्युत्तर दिले. सामन्याच्या 35 व्या मिनिटाला अचानक ढग दाटून वार्‍यासह गारा पडण्यास सुरुवात झाली. मोठमोठ्या गारांचा मारा झाल्याने प्रेक्षक गॅलरीतील फुटबॉलप्रेमींची तारांबळ उडाली. मैदानात गारांचा खच आणि पाण्याची डबकी साठल्याने स्पर्धा समितीने सामना थांबविण्याचा निर्णय घेतला.