Wed, Mar 27, 2019 02:00होमपेज › Kolhapur › ‘प्रॅक्टिस’ने ‘पीटीएम’ला बरोबरीत रोखले

‘प्रॅक्टिस’ने ‘पीटीएम’ला बरोबरीत रोखले

Published On: Apr 09 2018 1:32AM | Last Updated: Apr 09 2018 1:00AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळाच्या आक्रमक खेळाला अटीतटीची झुंज देत प्रॅक्टिस फुटबॉल क्‍लबने त्यांना बरोबरीत रोेखले. पीटीएमच्या आक्रमक चढायांना चोख प्रत्युत्तर देत संपूर्णवेळ सामना गोलशून्य बरोबरीत राखला. यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले.

शिवाजी पेठेतील श्री नेताजी तरुण मंडळातर्फे आयोजित रौप्य महोत्सवी फुटबॉल स्पर्धेंतर्गत यंदा कोल्हापूर स्पोर्टस् डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (केएसडीआय) यांच्या संयुक्‍त विद्यमाने ‘अटल चषक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असणार्‍या या स्पर्धेतील पहिल्या दोन बाद फेर्‍यानंतर रविवारी तिसर्‍या साखळी (लीग) फेरीस प्रारंभ झाला. लीग फेरीतील पहिलाच सामना पाटाकडील तालीम ‘अ’ विरुद्ध प्रॅक्टिस क्‍लब ‘अ’ यांच्यात झाला.

सामन्याच्या मध्यंतराला आणि शेवटी उद्योजक जितेंद्र गांधी, रणधीर महाडिक, नगरसेविका अश्‍विनी  बारामते, आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अनिकेत जाधव, शहर पोलिस उपाध्यक्ष डॉ. प्रशांत अमृतकर, जुना राजवाडा पोलिस निरीक्षक अनिल गुजर, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे तानाजी सावंत, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्कृष्ट खेळाडूंचा सन्मान आणि फुटबॉल शौकीनांसाठीचा लकी ड्रॉ काढून बक्षिसाचे वितरण झाले. सर्वांचे स्वागत पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, स्पर्धा समितीचे अध्यक्ष राजू साळोखे, प्रदीप साळोखे, राजेंद्र राऊत, उदय सुतार, दिग्विजय मळगे, राजू साठे,  आदींनी केले. फुटबॉल निवेदन विजय साळोखे यांनी केले. 

अटीतटीचा सामना तुल्यबळ...
सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून जलद खेळाचा अवलंब केला. प्रॅक्टिस क्‍लबने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत आघाडीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या ऋषिकेश पाटीलचे दोन-तीन चढाया अपयशी ठरल्या. ओंकार पाटीलकडून मिळालेल्या उत्कृष्ट पासवर ऋषिकेशने हेडद्वारे केलेला प्रयत्न गोलपोस्टच्या साईड पोलला लागून परतला. प्रॅक्टिसकडूनही अधून-मधून चढाया सुरूच होत्या. माणिक पाटीलने मारलेला ग्राऊंडिंग फटका गोलपोस्टच्या बाजूने गेला.

यानंतर सागर चिले, इंद्रजित चौगुले, राहुल पाटील यांच्या चढाया अपयशी ठरल्या. यामुळे मध्यंतरापर्यंतचा सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात दोन्ही संघांकडून वेगवान खेळ झाला. पीटीएमने आपल्या आक्रमक चढाया लागोपाठ सुरू ठेवल्या. मात्र, प्रॅक्टिसच्या बचावफळीत अभिजित शिंदे व गोलरक्षक राजीव मिरीयाल यांनी केलेल्या उत्कृष्ट बचावामुळे त्यांना वारंवार अपयश आले. अनेक चढाया फिनिशिंग अभावी फोल ठरल्या. ओंकार जाधवच्या पासवर ऋषिकेश पाटीलने सोपी संधी दवडली. अक्षय मेथे-पाटील याने सेंटरपासून बॉल पळवत नेत केलेली खोलवर चढाई थोडक्यात हुकली.

पाठोपाठ अकिमचा जोरदार प्रयत्न गोलरक्षक राजीव मिरीयालने उत्कृष्टरीत्या फोल ठरविला. प्रॅक्टिसकडूनही अखेरपर्यंत गोलसाठी चढाया सुरूच ठेवल्या. मात्र, त्यांना अखेरपर्यंत यश आले नाही. कैलास पाटील, सागर चिले, राहुल पाटील, माणिक पाटील यांचे प्रयत्न पीटीएमच्या बचाव व गोलरक्षकांनी अपयशी ठरवले. यामुळे सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.

हुल्‍लडबाजांकडून पंचांसह खेळाडूंना शिव्यांची लाखोली 
सामना अटीतटीचा आणि चुरशीचा झाला. यामुळे मैदानात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरीही प्रेक्षक गॅलरीत हुल्‍लडबाजांची बिनधास्त सुरूच होती. पंचांच्या निर्णयावर अक्षेप घेणे, त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना अश्‍लील शिव्या देणे, हिणकस शेरेबाजी करणे असे प्रकार पोलिसांच्या उपस्थितीतच सुरू होते. मैदानात लहानमुले, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यांना हुल्‍लडबजांच्या शिव्या ऐकून हातावर कान ठेवण्यापलिकडे पर्याय नव्हता.