होमपेज › Kolhapur › अमर रहे, अमर रहे, अटलजी अमर रहे

अमर रहे, अमर रहे, अटलजी अमर रहे

Published On: Aug 26 2018 1:28AM | Last Updated: Aug 26 2018 1:09AMकोल्हापूर : प्रतिनिधी

‘अमर रहे, अमर रहे, अटलजी अमर रहे’ अशा घोषणा... रस्त्यावर दुतर्फा उभे असलेल्या नागरिकांकडून अस्थिकलशाला वाहिली जात असलेली फुले... देशप्रेमाने भारलेली अटलजींची यादगार भाषणांची धून... अशा भावपूर्ण वातावरणात माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशाचे पंचगंगा नदीत विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी विसर्जन करण्यात आले.

आज, शनिवारी सकाळी बिंदू चौकातून फुलांनी सजवलेल्या वाहनातून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश विसर्जनासाठी पंचगंगा नदीघाट येथे नेण्यात आला. बिंदू चौकातून खासबाग, महाद्वार रोड ते पंचगंगा नदी या प्रमुख मार्गावरून अस्थिकलश नेण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, आमदार अमल महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर आदी सहभागी होते.  

महाद्वार रोडसह इतर रस्त्यांवर विविध ठिकाणी नागरिकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. यावेळी अस्थिकलशाला फुले वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा देत अस्थिकलश 
पंचगंगा नदीघाट येथे आणण्यात आला. यावेळी अस्थिकलशाचे विधिवत नदीत विसर्जन करण्यात आले. 

यावेळी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे महेश जाधव, इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अलका स्वामी, हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाट, नगराध्यक्ष अमोल केसरकर, जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई, सुभाष वोरा, ताराराणी आघाडीचे गटनेते नगरसेवक सत्यजित कदम, पुंडलिक जाधव, माणिक पाटील-चुयेकर, माजी नगरसेवक चंद्रकांत घाटगे, सुभाष रामुगडे, अशोक देसाई आदींसह विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.

यावेळी पालकमंत्री पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने सारा देश शोकाकुल झाला. त्यांच्याकडे हृदयाला हात घालणार्‍या वक्तृत्वाबरोबर सर्वसामान्यांना आपलेसे करणारे नेतृत्व होते. त्यांच्याकडे उच्चकोटीची क्षमता होती. त्यामुळेच त्यांच्या जाण्याने देशवासीय हळहळले. सर्वसामान्यांना त्यांच्या अस्थींचे दर्शन घेता यावे, यासाठी देशातील प्रमुख नद्यांमध्ये या अस्थींचे विसर्जन करण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला. आज पंचगंगा नदीत या अस्थींचे विसर्जन करण्यात आले.