होमपेज › Kolhapur › अश्‍विनी बिंद्रे प्रकरण : नवी मुंबईचे पोलिस आजर्‍यात

अश्‍विनी बिंद्रे प्रकरण : नवी मुंबईचे पोलिस आजर्‍यात

Published On: Mar 01 2018 1:38AM | Last Updated: Mar 01 2018 1:38AMआजरा : प्रतिनिधी

नागरी हक्क संरक्षण विभागाचे काम पाहणार्‍या सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे बेपत्ताप्रकरणी नवी मुंबई येथील गुन्हा अन्वेषण विभागाच्या  पथकाने बुधवारी आजरा येथील संशयित अभय कुरूंदकरच्या नातेवाईकांच्या सोमवार पेठेतील बंगल्याची झडती घेतली. 

यामुळे बिंद्रे प्रकरणाचे आजरा कनेक्शन स्पष्ट होत आहे.  दोन दिवसांपूर्वी अटक केलेला संशयितही आजर्‍यातीलच असल्याने परिसरात याची जोरदार चर्चा आहे. 

या प्रकरणातील संशयित आरोपी पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर याचा प्रदीर्घ शैक्षणिक कालावधी  आजरा येथेच गेला आहे. येथील स्थानिक शाळेत व महाविद्यालयीन शिक्षण झाल्याने त्याचा येथील मित्रपरिवार मोठा आहे. पुणे येथून मंगळवारी येथील एकास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून नवी मुंबई पोलिसांनी थेट आजर्‍याला केंद्रस्थानी ठेवून तपासाची सूत्रे वळविली आहेत. अश्‍विनी बिंद्रे बेपत्ता झाल्यापासून कुरूंदकरच्या मोबाईल कॉलवरून  येथील काहींशी त्याचे संभाषण झाल्याचे स्पष्ट होत आहे. यापूर्वी आजर्‍यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने याची चर्चा सुरू झाली आहे. आज दुपारी चारच्या सुमारास  नवी मुंबई पोलिसांनी कुरूंदकरच्या नातेवाईकांच्या घराची झडती घेतली. गोपनीयतेच्या कारणास्तव पोलिस अधिकार्‍यांनी अधिक तपशील देता येत नसल्याचे स्पष्ट केले. 15 दिवसांपूर्वी पोलिसांनी कुरूंदकरच्या हाळोली येथील फार्म हाऊसलाही भेट देऊन माहिती घेतल्याचे समजते. 

बिंद्रे प्रकरणाचा राज्यभर गाजावाजा झाल्यानंतर आजरा शहरातही कुरूंदकरबाबत दबक्या आवाजात चर्चा होती. आज पोलिसांनी थेट नातेवाईकांच्या बंगल्याची झडती घेतल्यानंतर मात्र ही चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे.