Sat, Jul 20, 2019 11:18होमपेज › Kolhapur › कुरूंदकर, फळणीकरच्या घरांची झडती

कुरूंदकर, फळणीकरच्या घरांची झडती

Published On: Mar 11 2018 1:21AM | Last Updated: Mar 11 2018 12:28AMकोल्हापूर/आजरा : प्रतिनिधी

सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिद्रे-गोरे हत्येच्या तपासासाठी आलेले नवी मुंबईचे पोलिस पथक कोल्हापुरात तळ ठोकून आहे. शनिवारी दुपारी  अभय कुरूंदकरच्या राजेंद्रनगर परिसरातील बंगल्याची झडती घेण्यात आली. यावेळी कुरूंदकरचे शेजारी, सुरक्षारक्षकांकडेही चौकशी करण्यात आली. पथक अर्धा तास या ठिकाणी होते. आजर्‍यामध्ये दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास या प्रकरणातील अन्य आरोपी महेश फळणीकर याच्या गणपत गल्लीतील घराची झडती घेतली. यावेळी फळणीकरही सोबत होता. 

बिद्रे-गोरे यांची मुंबईत हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कुरूंदकरला सहकार्य करणार्‍यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. बिद्रे-गोरे यांच्या मृतदेहाच्या काही अवयवांची आजर्‍यात विल्हेवाट लावल्याचाही संशय आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी आजर्‍यातील कुरूंदकरने फार्म हाऊसचा वापर केला आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत.  

राजेंद्रनगरातील बंगल्याची झडती
तपासी अधिकारी सहायक आयुक्त संगीता अल्फान्सो स्वत: कोल्हापुरात आल्या आहेत. शनिवारी दुपारी राजेंद्रनगरातील येथील कुरूंदकरच्या रो बंगल्याची झडती घेण्यात आली. या बंगल्याला आरती कुरूंदकर यांच्या नावाची पाटी आहे. दुपारी तपास पथक राजेंद्रनगरात दाखल झाले. या ठिकाणी सध्या कोणीही राहण्यास नाही. पोलिसांनी शेजार्‍यांसह सुरक्षारक्षकाकडे चौकशी केली. हे पथक अर्ध्या तासाहून अधिकवेळ या ठिकाणी होते.

कोल्हापुरातील काही पोलिसही रडारवर?
अभय कुरूंदकर मूळचा कोल्हापूरचा असल्याने त्याचा कोल्हापुरात मित्र परिवार आहे. हत्या प्रकरणानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी कोल्हापुरातील काही पोलिस मित्रांनी त्याला मदत केली आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत. कुरूंदकर याच्या मोबाईलचे सीडीआर तपासण्याचे काम सुरू असून कोल्हापुरातील काही पोलिस रडारवर असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

फळणीकरच्या वडील, भावाकडेही चौकशी
आठवडाभरात दुसर्‍यांदा मुंबई पोलिसांनी आजरा येथे भेट दिली आहे. बिद्रे यांच्या हत्येनंतर आजरा परिसरातील बर्‍याचजणांची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. आज याच पार्श्‍वभूमीवर आजर्‍यातील फळणीकर याच्या घरी पोलिस पथकाने भेट दिली. पाच जणांच्या पथकाने सुमारे अडीच तास फळणीकर याच्या घराची झडती घेतली. यावेळी घरी फळणीकर याचे वडील व भाऊ उपस्थित होते. त्यांचीही पोलिसांनी चौकशी केली. यावेळी फळणीकर याच्या घरी यापूर्वी असणार्‍या भाडोत्री कुटुंबांचीही माहिती घेतली.