Mon, Mar 25, 2019 18:15होमपेज › Kolhapur › अश्‍विनीच्या हत्येनंतर फ्लॅटवर तीन आमदारांची उपस्थिती

अश्‍विनीच्या हत्येनंतर फ्लॅटवर तीन आमदारांची उपस्थिती

Published On: Mar 08 2018 8:25PM | Last Updated: Mar 08 2018 8:25PMकोल्हापूर : प्रतिनिधी

सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिद्रे-गोरे यांची हत्या झाल्यानंतर मुख्य संशयित व निलंबित पोलिस अधिकारी अभय कुरूंदकरने मित्र राजेश पाटील याच्याशी संपर्क साधून, त्याला कळंबोली येथील फ्लॅटवर बोलावले. त्यानंतर काही काळात राजेश पाटील तीन विद्यमान आमदारांसमवेत फ्लॅटवर दाखल झाला. संशयित कुरूंदकर, पाटील याचे सीडीआर तपासल्यास घटनास्थळी उपस्थित आमदारांची नावेही निष्पन्न होतील, अशी धक्कादायक माहिती बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.

अभय कुरूंदकरने साथीदारांच्या मदतीने अश्‍विनी बिद्रे-गोरे यांची अमानुष हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचे, नवी मुंबई येथील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना डिसेंबर 2016 मध्ये माहिती लागली होती. तथापि, चौकशी प्रक्रियेत अमर्याद राजकीय हस्तक्षेप झाल्याने संशयित मोकाट राहिला होता, असाही त्यांनी आरोप केला.

बिद्रे-गोरे यांचे पती राजू गोरे, वडील जयकुमार अण्णासाहेब बिद्रे व भाऊ आनंद बिंद्रे यांनी पत्रकार परिषदेत नवी मुंबईतील वरिष्ठ पोलिस अधिकारी व काही बड्या लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला. राजू गोरे, आनंद बिद्रे म्हणाले, अश्‍विनी बिंद्रे-गोरे हत्येप्रकरणी अटक झालेल्या संशयितांना बड्या राजकीय मंडळींचा वरदहस्त आहे. उपलब्ध पुरावे दडपण्याचा संशयित प्रयत्न करू शकतात. त्यामुळे हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावा, तसेच विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची शासनाने नियुक्ती करावी.

तपासाधिकारी संगीता शिंदे-अल्फोन्सो यांनी अवघ्या तीन-चार दिवसांत गुन्ह्याचा छडा लावून संशयितांना जेरबंद केले आहे. मात्र, अवघ्या तीन महिन्यांसाठी त्यांची गुन्ह्याच्या तपासासाठी सहायक म्हणून नियुक्ती झाली आहे. या काळात योग्य दिशेने तपास होणार नाही. अल्फोन्सो यांना तपासासाठी स्वतंत्रपणे अधिकार देण्यात यावेत, अशीही मागणी कुटुंबीयांनी केली.  

अश्‍विनी यांची हत्या झाल्यानंतर संशयित कुरूंदकरने एका बड्या माजीमंत्र्यांचा भाचा राजेश पाटीलशी संपर्क साधला. भेदरलेल्या कुरूंदकरने पाटीलला तातडीने कळंबोलीतील फ्लॅटवर येण्यास सांगितले. रात्री उशिरा तीन आमदारांसमवेत पाटील फ्लॅटवर आला होता, असेही राजू गोरे यांनी सांगितले. हे आमदार कोण आहेत?  फ्लॅटवर येण्याचा उद्देश काय? गुन्ह्यात त्यांचा कितपत सहभाग असावा? याचीही चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.

मुलीसह गायब करण्याची धमकी
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या काही मंडळींनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या आहेत. आपल्या बारा वर्षांच्या मुलीसह तुलाही कायमचा गायब करण्याची धमकी देण्यात आल्याचे राजू गोरे यांनी सांगितले.

साक्षीदारांना पिटाळून लावले
अश्‍विनी बिद्रे-गोरे यांचे वास्तव्य असलेल्या अपार्टमेंटमधील परप्रांतीय वॉचमन, मदतनीस यांचे तपासाधिकार्‍यांनी जबाब नोंदवून त्यांना साक्षीदार करण्यात आले होते. तथापि, वरिष्ठाधिकारी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींच्या दहशतीमुळे सर्व साक्षीदारांना तेथून पळवून लावण्यात आले आहे. 

वडिलांना रडू कोसळले!
संशयितांनी मुलीच्या मृतदेहाचे वूडकटरने तुकडे केल्याची माहिती मिळताच मनाला मोठा धक्काच बसला. मुलीचा अत्यंत क्रूरपणाने शेवट होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. अश्‍विनी यांच्या आठवणीने वडील राजकुमार गोरे यांना पत्रकार बैठकीत रडू कोसळले. न्यायदेवतेवर विश्‍वास व्यक्त करत, मारेकर्‍यांना कठोर शिक्षा होईल यात शंका नाही, हे सांगताना त्यांचे दोन्ही हात थरथरत होते.