होमपेज › Kolhapur › कुरूंदकर अखेर बडतर्फ

कुरूंदकर अखेर बडतर्फ

Published On: Jul 04 2018 2:14AM | Last Updated: Jul 04 2018 1:36AMकोल्हापूर : दिलीप भिसे

महिला पोलिस अधिकारी अश्‍विनी बिद्रे-गोरे हत्येतील मुख्य संशयित व वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकरला अखेर पोलिस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलिस महासंचालकांनी ही कारवाई केली. याशिवाय वारणा लुटीतील संशयित अधिकारी विश्‍वनाथ घनवट, सूरज चंदनशिवेसह सात पोलिसांवरही लवकरच बडतर्फीची कारवाई शक्य आहे, असे मंगळवारी सांगण्यात आले.

मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील आळते (ता. हातकणंगले) येथील सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिद्रे-गोरे यांची कुरूंदकर व साथीदारांनी निर्दयी, क्रूरपणे हत्या केल्याचे नवी मुंबई पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे. गंभीर गुन्ह्यातील पुरावा नष्ट करण्यासाठी संशयितांनी महिला अधिकार्‍याच्या मृतदेहाचे तुकडे करून मीरा-भाईंदर खाडीत फेकून दिल्याचाही धक्कादायक प्रकार उघडकीला आला होता.

घनवट, चंदनशिवेसह पोलिस होणार बडतर्फ
सांगलीतील अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह पाच पोलिसांवर खुनाचा ठपका ठेवून अटकेची कारवाई झाली होती. कालांतराने संशयितांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर वारणानगर चोरीतील संशयित विश्‍वनाथ घनवट, सूरज चंदनशिवे, दीपक पाटील, रवींद्र पाटीलसह सात पोलिसांना लवकरच पोलिस दलातून बडतर्फीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत ही कारवाई शक्य आहे, असेही वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.

गृहखात्यावर नामुष्कीची ओढवली आफत
राज्यातील चारशेवर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या पदोन्नतीच्या यादीत संशयित अभय कुरूंदकर, वारणा लुटीतील संशयित विश्‍वनाथ घनवट हे सध्या कोल्हापुरातील बिंदू चौकातील सबजेलमध्ये बंदिस्त आहेत. पोलिस उपअधीक्षकपदाच्या पदोन्नती यादीत या दोघांच्या नावाचा समावेश झाल्याने पोलिस यंत्रणेवर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली होती.

वरिष्ठाधिकार्‍यांचा दुजोरा
पोलिस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यानेच महिला अधिकार्‍याच्या असहायतेचा गैरफायदा घेत, अमानुष हत्या करून मृतदेह खाडीत फेकून दिल्याचे उघड झाल्याने, पोलिस दलावर मोठी नामुष्की ओढवली होती. या क्रूर घटनेची दखल घेत पोलिस महासंचालकांनी अभय कुरूंदकरला बडतर्फ केले. ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी कारवाईला दुजोरा दिला आहे.