Mon, May 20, 2019 22:03होमपेज › Kolhapur › भयमुक्त महाराष्ट्र, भाजपमुक्त भारतसाठी कामाला लागा

भयमुक्त महाराष्ट्र, भाजपमुक्त भारतसाठी कामाला लागा

Published On: Sep 01 2018 1:46AM | Last Updated: Aug 31 2018 11:53PMकोल्हापूर : प्रतिनिधी

भाजप सरकार गेंड्याच्या कातडीपेक्षाही जबर आहे, याची गेंड्यालाही लाज वाटत असेल. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हीच भाजपची नीती आहे. खोट्या आश्‍वासनांवर जनतेला फसवण्याचे काम सुरू आहे. फक्त जाहिरातबाजी हाच एककलमी सरकारचा कार्यक्रम सुरू आहे. शेतकरी, तरुणांसह समाजातील सर्व घटकांत सरकारविरोधात असंतोष खदखदत आहे. याला भाजपइतकीच शिवसेनासुद्धा जबाबदार आहे. भयमुक्त महाराष्ट्र आणि भाजपमुक्त भारत निर्माण करण्यासाठी 2019 मध्ये या सरकारचे सर्वांनी मिळून विसर्जन करू या. निवडणुका कधीही होऊ देत, काँग्रेस पक्ष निवडणुकीस तयार आहे, असे सांगत कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी केले. पुरोगामी विचारधारेला विरोध करणारे सरकार उलथून टाकण्यास सज्ज व्हा, असे आवाहन यावेळी महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले.

काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेची सुरुवात शुक्रवारी कोल्हापुरातून झाली. यानिमित्त संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात कार्यकर्त्यांचा जनसंघर्ष मेळावा झाला. या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष खा. चव्हाण बोलत होते. मेळाव्यास कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. तर व्यासपीठावर राज्यातील काँग्रेसचे नेते, आमदार, खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यात सर्वच नेत्यांनी राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारवर सडकून टीका केली.

प्रदेशाध्यक्ष खा. चव्हाण म्हणाले, हे सरकार झोपेचे सोंग घेणारे आहे. आम्ही या सरकारच्या कामगिरीचा पर्दाफाश करत आहोत. ‘हम आगे बढेंगे, आप साथ रहेंगे’. आम्ही राज्यभर संघर्ष करत आहोत. यासाठी तुमचा आवाज बुलंद केल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना आणि भाजपचे मंत्री रस्त्यांतील खड्ड्यांची जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहेत. आधा-आधा मिल-बाटके खायेंगे, असे यांचे आहे. त्यामुळे शिवसेनाही या कारभाराला भाजपइतकीच जबाबदार आहे. महाराष्ट्रावर पाच लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. यंदा पाऊस चांगला पडला असूनही पेट्रोल, डिझेलवर दुष्काळ अधिभार अजून घेतला जात आहे. देशात सर्वाधिक पेट्रोल, डिझेलचा दर राज्यात आहे. सरकारकडे द्यायला पैसेच शिल्लक नाहीत. सरकार कसे चालवायचे असते, हे या लोकांना माहीत नाही. हे निकम्मे सरकार आहे. म्हणूनच आम्ही या सरकारला फसवणीस सरकार म्हणतो. शेतकर्‍यांना कर्जमाफी अजूनही मिळत नाही. पंधरा हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठा समाजाने आरक्षणासाठी लाखोंचे 58 मोर्चे काढले. कुठेही गालबोट लागले नाही. आता लोकांची सहनशीलता संपली. प्रश्‍न स्फोटक होत आहेत. असे असताना सरकार तोंडाला गुळाचे बोट लावत आहे. मराठा समाजाला इतर समाजापासून तोडण्याचे काम करत आहे. आम्ही मराठा, मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण या सरकारला चालू करता येत नाही. 

मराठा, मुस्लिम, धनगर समाज बांधवांनो, आता तुम्ही या सरकारकडे तुमच्या हक्कासाठी भीक मागू नका. कारण हे काहीच देणार नाहीत. तुमच्या हक्कांसाठी हे सरकारच उलथून टाकायला हवे. सनातनी विचारांच्या कार्यकर्त्यांकडे जिवंत बॉम्ब सापडले. भिडेंसारख्या मंडळींना अभय दिले जाते. सनातनी विचारांना शासनाची फूस आहे. कवी, विचारवंतांना लक्ष इतरत्र वळवण्यासाठी अटक केली असली, तरी सर्वोच्च न्यायालयाने याबाबत सडेतोड भूमिका घेतल्याने त्यांना मर्यादा आल्या. इथे प्रत्येकाची माहिती आणि भाषणे टिपून पाठवण्याचे काम सुरू असल्याचे यापूर्वी आ. सतेज पाटील यांनी सांगितले; पण आम्ही कुणालाच घाबरत नाही. भाजप, संघ विचारांना कार्यकर्त्यांनी ठोस उत्तर देत मुकाबला करावा. हा लढा अधिकच तीव्र करावा. ही संघर्ष यात्रा म्हणजे सरकारला निवडणुकीची पूर्वतयारी वाटत असली, तरी तसे त्यांनी समजावे. परंतु, आमची 2019ची तयारी केव्हाच पूर्ण झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. आपण सर्वांनी एकत्र येऊन परिवर्तन घडवू या, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

देशात हिटलरशाही आहे : खर्गे
देशात भाजपचे सरकार आल्यापासून जाती-धर्मांमध्ये फूट पाडण्याचे काम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार धोकादायक आहेत. खोटं बोल; पण रेटून बोल, या वृत्तीने लोकांना फसवले जात आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी नेहमीच लोकशाही भक्कम रहावी आणि सामाजिक एकता अबाधित ठेवत सत्ता राबवली; पण भाजपचे सरकार सनातनी संस्थेसारख्या प्रतिगामी संघटनेला मदत करते, तर शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारधारेला मानणार्‍या विचारवंतांना अटक करत आहे. अशा पुरोगामी विचारधारेला विरोध करणारे सरकार उलथून टाकण्यास सज्ज व्हा, असे आवाहन महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. खर्गे म्हणाले, काँग्रेसने सत्तर वर्षे लोकशाही जिवंत ठेवून भक्कम केल्यानेच नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होऊ शकले. त्यामुळे काँग्रेसने सत्तर वर्षांत काय केले, हा भाजपचा सवाल पोकळ आहे. देशात हिटलरशाही आहे. खोट्या जाहिरातबाजीसाठी भाजपने 4 हजार 333 कोटी रुपये खर्च केले.  प्रत्येकाच्या बँक खात्यात पंधरा लाख अजून का पोहोचले नाहीत, हा सवाल जनतेने भाजपला विचारावा. पुरोगामी विचारवंतांची हत्या 
करणारे मोकाट असताना, दुसरीकडे सनातनी संस्थेला प्रोत्साहन दिले जाते.

खर्गे यांच्याकडून नेत्यांना कानपिचक्या
राज्य प्रभारी खर्गे यांनी भाषणाच्या अखेरीस व्यासपीठावरील नेत्यांना कानपिचक्या दिल्या. ते म्हणाले, आमचे नेते लढवय्ये आहेत. स्ट्राँग आहेत. परंतु, नुसतीच भाषणे करून किंवा बोलून यश मिळत नाही. यासाठी ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’, तसेच फक्त नवस करून इच्छा पूर्ण होत नाहीत, तर सर्वांनी एकत्र राहून तन, मन व धनाने प्रयत्न केले, तरच यश मिळेल, असे सांगताना तुकारामांच्या अभंगातील दाखले त्यांनी दिले.

भाजप सरकार पुरोगामी विचारवंताच्या हत्येचे छुपे मारेकरी : विखे-पाटील
सनातनी संस्थेसारख्या संघटना थंड डोक्याने तरुणांची माथी भडकावत आहेत. सफाईदारपणे डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या तरुणांकडून करण्यात आल्या. राज्य सरकारला मारेकर्‍यांवर कारवाई करण्याची इच्छा नाही. कर्नाटक सरकारने माहिती दिल्यानंतर राज्यात अटकसत्र सुरू झाले. 

मानवाधिकार कार्यकर्त्यांना अटक करण्याचे षड्यंत्र : पृथ्वीराज चव्हाण
कॉ.पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या करणार्‍यांवर कारवाई होत नाही. नालासोपारा येथे वैभव राऊत याच्या घरात 20 जिवंत बॉम्ब सापडतात. हे कोणावर वापरले जाणार होते, यावर कोणीच बोलत नाही. या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी विचारवंत, कवी, मानवाधिकार कार्यकर्त्यांना अटक करून तुरुंगात टाकण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.  पक्षांतर्गत  संघर्ष मिटविण्याचे प्रयत्न सुरू असून त्याची जबाबदारी महाराष्ट्राचे प्रभारी खा. मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर सोपविण्यात आली असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महालक्ष्मी मंदिरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

बेरोजगारीच्या प्रश्‍नावरून भाजपला घेरले
भाषणात सर्वच नेत्यांनी बेरोजगारीवरून भाजपवर टीकेचा भडिमार केला. लोकसभा निवडणुकीत वर्षाला दोन कोटी लोकांना नोकर्‍या देऊ, असे आश्‍वासन दिले होते. चार वर्षांत 8 कोटी 25 लाख कोटी लोकांना रोजगार दिला का, असा प्रश्‍न खा. खर्गे यांनी उपस्थित केला. खा. अशोक चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस 82 हजार नोकर्‍या उपलब्ध करून देऊ, असे म्हणतात. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणतात, नोकर्‍याच उपलब्ध नाहीत. उद्योगधंद्याच्या नावाखाली तरुणांना पकोडा तळण्याचे उपदेश भाजप नेते देत आहेत. असे वक्तव्य रोजगाराच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याची टीका नेत्यांनी केली.